मुंबई, १० सप्टेंबर २०२३ : जेव्हापासून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट मोठ्या पडद्यावर आला आहे, तेव्हापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केल्याचे दिसत आहे. चित्रपटाने दोन दिवसांत १०० कोटींचा टप्पा ओलांडत आता तिसऱ्याच दिवशी ‘जवान’ २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. बॉक्स ऑफिसवर कलेक्शनच्या वाढत्या गतीने निर्मातेही खूप खूश आहेत. ‘जवान’ चित्रपटातील शाहरुख खान आणि नयनतारा यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. या चित्रपटात विजय सेतुपतीही मुख्य भूमिकेत आहे. बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग केल्यानंतर आता ‘जवान’च्या तिसऱ्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्टही समोर आला आहे.
या चित्रपटाने पहिल्या दिवशी सर्व भाषांसह बॉक्स ऑफिसवर ७५ कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली. चित्रपट दुसऱ्या दिवशी केवळ ५३ कोटींचा गल्ला जमवू शकला. तिसऱ्या दिवशी ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा आपली जादू चालवली आहे. ‘जवान’ ने तिसऱ्या दिवशी ७४.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाने एकूण २०२.७३ कोटींचा व्यवसाय केला आहे.
अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटातील शाहरुख खानची ॲक्शन प्रेक्षकांना भावते आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी किंग खानचे चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचा परिणाम म्हणजे चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसत आहे, ज्यामध्ये तो आझाद नावाच्या भूमिकेत आहे तर दुसऱ्या पात्राचे नाव विक्रम राठौर आहे. चित्रपटात नयनतारा पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे, तर दीपिका पदुकोण विक्रमची पत्नी आणि आझादच्या आईच्या भूमिकेत असुन चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड