नांदेड, ११ सप्टेंबर २०२३ : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील प्रमुख शूटरला नांदेड पोलिसांनी पंजाब येथील कारागृहातून ताब्यात घेतले आहे. संजय बियाणी यांच्या शारदा नगर निवासस्थानासमोर दोघांनी गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली होती. संजय बियाणी यांनी खंडणी न दिल्याने कुख्यात दहशदवादी हरविंदर सिंह उर्फ रांगा याने त्यांची हत्या घडवल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.
५ एप्रिल २०२२ रोजी संजय बियाणी यांच्या शारदा नगर निवासस्थानासमोर दोघांनी गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली होती. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बियाणी यांच्या मृत्यूनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात बिल्डर बियाणी यांचा मृत्यू झाल्याने गोळीबार करणाऱ्यांच्या तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष एसआयटी पथकाची निर्मिती केली होती. संजय बियाणी यांनी खंडणी न दिल्याने कुख्यात दहशदवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदा याने त्यांची हत्या घडवल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.
एसआयटीने या प्रकरणात नांदेड मधून एकूण १७ जणांना अटक केली आहे. गोळ्या झाडणारे दोघे फरार होते. त्यापैकी दीपक रांगा याला गेल्या जानेवारी महिन्यात एनआयने नेपाळ बॉर्डरवरून अटक केली होती. त्याच्यावर पंजाब येथील मोहाली पोलीस मुख्याल्यावर ग्रेनेड हल्ला केल्याचा आरोप होता. शिवाय अनेक प्रकरणात तो पंजाब, हरियाणा, नांदेड पोलिसांना हवा होता. सध्या दीपक रांगा चंदीगड कारागृहात बंद होता. संजय बियाणी यांच्या हत्याकांडाच्या तपासासाठी नांदेड पोलिसानी दीपक रांगा याला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संजय बियाणी यांची खंडणीच्या कारणावरुन हरविंदर सिंह रिंदा याच्या साथीदाराने त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बियाणींच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तर दुसरीकडे रिंदाच्या दहशतीमुळे नांदेड शहरातील अनेक मोठे व्यावसायिक, व्यापारी यांनी स्थलांतराची तयारी केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे