मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ : येत्या काही दिवसांत महाराष्ट्र शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम बीड जिल्ह्यातील परळी येथे होऊ घातलेला आहे. मात्र शासनाच्या या कार्यक्रमाला केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्चावरुन, शासन आपल्या दारी खर्च देखील सर्व सामान्यांच्या माथ्यावरी असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोजक्या शब्दांत सरकारवर टीका केली.
परळी येथील नियोजित कार्यक्रमाच्या मंडपासाठी जवळपास २ कोटी २१ लाख ९० हजार ८५० रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. मुख्य मंडपासाठी ८१ लाख ९४ हजार १०० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. साईट मंडपासाठी ६० लाख १४ हजार १४० रुपायांची निविदा मागविण्यात आली आहे तर इलेक्ट्रिक कामांसाठी ७९ लाख ८२ हजार ५१० रुपायांची निविदा मागवण्यात आली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा संताप व्यक्त केला आहे.
१७ ऑगस्ट रोजी परळी येथे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला देखील भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता. आता शासन आपल्या दारी उपक्रमासाठी देखील तोडीसतोड मंडप उभारण्याचे नियोजन आहे. मात्र यांचा सर्व खर्च करदात्यांच्या खिशातून केला जाणार आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर