पुणे, १९ सप्टेंबर २०२३ : महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे, मात्र अजूनही काही भाग असे आहेत जेथे पावसाचे चिन्ह दिसत नाही. मात्र यंदा गणपती बाप्पाच्या आगमनाला पावसाची साथ लाभत आहे. आजपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे अशी माहिती हवामान खात्याने दिलीय. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. याशिवाय महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील पाण्याचे संकटही दूर होऊ शकते.
माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र आता ईशान्य बंगालच्या उपसागराच्या दिशेने सरकले आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढग दाटून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्धा, नागपूर आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनाही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचवेळी हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मंगळवारी पुणे शहर, मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात पाऊस पडेल. दरम्यान, मंगळवारी गणरायाच्या आगमनालाही पावसाची साथ लाभणार आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड