वादग्रस्त वक्तव्यावर काय म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू

मुंबई: राहुल गांधी यांच्या वादग्रस्त विधानावर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रणजित सावरकर म्हणाले, ‘ही चांगली गोष्ट आहे की, त्यांचे नाव राहुल सावरकर नाही. त्यांचे नाव सावरकर असते, तर आम्हाला तोंड काळे करावे लागले असते. राहुल गांधी यांनी आजी इंदिरा गांधी यांचे त्यांच्या नावातून ‘नेहरु’ काढल्याबद्दल आभार मानले पाहिजेत. कारण त्यांचे आधीचे नाव इंदिरा गांधी-नेहरू होते. देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधीच सत्तेच्या मोहाने नेहरूजींनी व्हॉईसराय मंडळाचे सदस्य बनण्यासाठी ‘भारताचे सम्राट किंग जॉर्ज (सहावे) आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. स्वा. सावरकरांनी असे घृणास्पद कृत्य करण्याचा स्वप्नात देखील विचार केला नसता. ही गुलामीची शपथ नेहरूजींनी इतक्या निष्ठेने निभावली की, १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावरही ते १९५० पर्यंत किंग जॉर्ज लाच भारताचा सम्राट मानत होते. सर्व महत्त्वपूर्ण निर्णय घेताना त्यांची अनुमती घेत होते. मार्च १९४८ मध्ये जेव्हा राजाजी यांना गव्हर्नर जनरल बनवले. तेव्हाही किंग जॉर्ज यांची अनुमती घेतली होती., असे लोकच स्वा. सावरकर यांच्यासारख्या देशभक्ताचा अपमान करू शकतात. उल्लेखनीय आहे की, स्वा. सावरकर यांच्या अंत्ययात्रेसाठी सरकारने तोफगाडा देण्यास नकार दिला होता, पण जेव्हा नेहरूजींची प्रिय मित्र, लेडी माउन्टबॅटन यांचा मृत्यू झाला. तेव्हा कोणीही न मागताच भारतीय नौदलाची युद्धनौका ‘त्रिशूल’ तिथे पाठवली होती. हा देश काय कोणाची जहागीर आहे? आता ही स्वातंत्र्यपूर्व काळातील देशभक्त काँग्रेस राहिली नाही, हा तर एका गुलाम वंशाचा पक्ष झाला आहे.’
मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही, असे म्हणणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे योग्य नाही. हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा