छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड तालुक्यात वाळू माफियांवर पोलिसांची कारवाई

कन्नड, छत्रपती संभाजी नगर १५ नोव्हेंबर २०२३ : कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील पूर्णा नदी पात्रात गेल्या अनेक दिवसापासून वाळू माफियांनी हैदोस घालीत पूर्णा नदी पात्राची चाळणी करून टाकली आहे. येथे नदीपात्रात मोठमोठाले खड्डे पडले असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवीत गौण खनिजाची सर्रास लूट सुरू आहे. दररोज तब्बल दोनशे ब्रास वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळतेय.

पूर्णा नदी पात्रातून दररोज सात आठ ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करीत असल्याची माहिती, कन्नडचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांना मिळाली. विजय कुमार ठाकुरवाड यांनी रात्री पथक तयार करून, रात्री एक वाजेच्या सुमारास खेड नेवपूर शिवारात वाळूने भरलेले विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर जप्त केले. चालक कौतिक सखाराम अहिरे आणि समाधान राजधर जेठे राहणार नेवपूर यास विचारणा केली असता दोघांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

सदर चालक मालकांविरुद्ध पिशोर ठाण्यात गुन्हा दाखल करून सात लाख दहा हजाराचा वाळुने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर्स सह मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी कन्नड विजय कुमार ठाकूरवाड, पोलीस प्रमोद सोनवणे, पोलीस अंमदार गणेश कव्वाल, निंभोरकर यांनी ही कामगिरी बजावली. पुढील तपास बीट जमादार सुनील भिवसने आणि वसंत पाटील करीत आहे.

नेवपुर महसूल मंडळात वाळू माफियांना स्थानिक तलाठी व स्थानिक पोलीस बीट जमादाराचा आशीर्वाद असल्याची परिसरात चर्चा आहे करंजखेड येथे पोलीस चौकी असून सुद्धा नेवपुर पूर्णा नदीतून वाळू माफिया सर्रास अवैध वाळू उपसा करीत आहे उपविभागीय अधिकारी कन्नड यांना जर स्वतः येऊन कारवाई करावी लागू लागली तर स्थानिक करंजखेड चौथीचे अथवा बीटचे जमादार काय करत आहे असा प्रश्न ही नागरिक करत आहे. तरी संबंधित महसूल विभागाने व पोलीस प्रशासनाने या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कडक शासन करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : मिलिंद कुमार लांडगे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा