पुणे, २२ नोव्हेंबर २०२३ : आयसीसीने श्रीलंकेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ICC ने श्रीलंकेकडून अंडर-१९ पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२४ चे यजमानपद हिसकावून घेतले आहे. आता १९ वर्षांखालील विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला जाणार आहे. सरकारच्या कथित हस्तक्षेपामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या निलंबनानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.
२०२४ चा पुरुष अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. भारत, श्रीलंका आणि नवीन यजमान दक्षिण आफ्रिकेसह १६ देश यात सहभागी होणार आहेत. अंडर-१९ वर्ल्ड कपची १५ वी आवृत्ती दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. ही स्पर्धा आधी श्रीलंकेत होणार होती, मात्र आयसीसीच्या निर्णयानंतर ती आता दक्षिण आफ्रिकेत होणार आहे.
भारताने आयोजित केलेल्या विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर रणसिंगे यांनी शम्मी सिल्वा यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय मंडळ बरखास्त करून अंतरिम समिती स्थापन केली. त्यानंतर शम्मी सिल्वा यांच्या नेतृत्वाखाली एसएलसीने याविरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने ही अधिसूचना १४ दिवसांसाठी स्थगित केली होती.
आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. बोर्डावर श्रीलंका सरकारच्या हस्तक्षेपामुळे आयसीसीने हे पाऊल उचलले. श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका सरकार यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड