जेजुरी, पुणे ११ डिसेंबर २०२३ : १९७१ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारतीय सैन्याच्या पॅराकमांडोंनी हवाई मार्गाने जाऊन पोंगली नदीच्या पुलावर ताबा मिळवत, पाकिस्तानच्या सैनिकांची रसद तोडण्यात यश मिळवले होते. यानंतर पाकिस्तानी सैनिक भारताला शरण आले. तो दिवस पोंगली डे म्हणजेच विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील विविध ठिकाणी एकत्र येत या युद्धातील सहभागी सैनिक हा विजय दिवस पोंगली डे म्हणून साजरा करतात.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे, टू पॅरास्पेशल फोर्स माजी सैनिक संघटना -ऑल इंडिया ग्रुपच्यावतीने पोंगली डे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या निवृत्त जवानांनी पोंगली डे कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात वीर माता, वीर पत्नी आणि विरत्व प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पॅरा कमांडो असलेल्या माजी सैनिकांनी पॅरामोटरिंग करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जेजुरी येथील राईनो फ्लाईंग क्लबच्यावतीने सैनिकांसाठी या फ्लाइंग राईडचे आयोजन करण्यात आले होते. माजी सैनिकांनी उंच आकाशातून जेजुरी आणि परिसराचे विहंगम दृश्य पाहात, जेजुरीगड आणि कडेपठार मंदिराचे दर्शन घेतले.
न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे