उजनीच्या पाण्यासाठी माढा तालुक्यातील कुर्डू आणि परिसरातील १३ गावच्या ग्रामस्थांचे नागपूर मध्ये उपोषण

माढा, सोलापूर ११ डिसेंबर २०२३ : नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान माढा तालुक्यातील कुर्डू आणि परिसरातील १३ गावचे ग्रामस्थ नागपूर मधील यशवंत स्टेडियम येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत. पंढरपूर तालुका राष्ट्रवादीचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी नागपूर येथे उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणास पाठिंबा दिला. उजनी धरणातून सिना- माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यास माढा तालुक्यातील कुर्डू आणि परिसरातील १३ गावांना त्याचा फायदा होणार आहे. हे पाणी सोडण्यासाठी येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षापासून आंदोलने व उपोषणाच्या माध्यमातून हा विषय शासनाच्या दारी मांडलेला आहे. परंतु त्याची अद्याप शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.

मौजे कुर्डू ता. माढा या गावालगत असलेल्या बेंद ओढ्याला उजनी धरणातून सिना – माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यास मौजे कुर्डू, आंबाड, पिंपळखुंटे, चौंभे -पिपरी, कुर्डुवाडी, भोसरे, वेताळवाडी, वडाचीवाडी, रंणदिवेवाडी, वडशिंगे, तडवळे, उंदरगांव व महातपुर या १३ गावांना त्याचा फायदा होणार आहे. ओढ्यास पाणी आल्यास जवळपास ३५ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र प्रत्यक्षात सिंचनाखाली येणार आहे. यासाठी अनेक वर्षापासून अनेक आंदोलने केली गेली तरी अद्याप शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ नागपूर मधील यशवंत स्टेडियम येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत.

त्यासंदर्भात उपोषणातील प्रमुख मागण्या-
१) सिना माढा सिंचन योजनेचे शिराळ ते कुर्डू राहिलेले अर्धवट काम पूर्ण करणे.
२) सिना माढा सिंचन योजनेची शिल्लक पाईपलाईन शेडशिंगे येथे आणणे अथवा भिमा सिना जोडकालव्यातून बेंद ओढ्यात पाणी सोडणे.
३) वरील योजनेच्या माध्यमातून बेंद ओढ्यात पाणी सोडून कुर्डू व परिसरातील १३ गावांचा पाणी प्रश्न सोडविणे.

यासोबतच नागपुरात, बावी ता.माढा येथील पाणी संघर्ष समिती देखील हक्काच्या पाण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण बसली आहे. सिना- माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यास मौजे बावी, तुळशी, परितेवाडी, पिंपळखुटे या गावांना त्याचा फायदा होणार आहे. “धरण उष्याला,अन कोरड घश्याला अशी गावातील नागरिकांची दैनी अवस्था निर्माण झाली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : नवनाथ खिल्लारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा