रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा वाढता आलेख, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे या वर्षात ९ तक्रारी

रत्नागिरी ११ डिसेंबर २०२३ : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात भ्रष्टाचाराच्या प्रकारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. गतवर्षी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीकडे केवळ दोनच भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले होते. मात्र यावर्षी फोन कॉल आणि अन्य तक्रारी अशा एकूण नऊ घटनांची नोंद झाली आहे. यावर्षी तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी तसेच वर्ग १ आणि वर्ग २ च्या अधिकाऱ्यांवर लाचेचे गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यातील चिपळूणमध्ये १, दापोली २, खेड – संगमेश्वर -देवरुख प्रत्येकी १ व रत्नागिरी ३ अशी तालुका निहाय गुन्हे दाखल झाले आहेत. सरत्या वर्षाचा मागोवा घेताना चव्हाण म्हणाले, भ्रष्टाचाराचा प्रकार रोखण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची शहानिशा झाल्यावर संबंधित गुन्हेगार ज्या ठिकाणी असेल तेथे विभागाकडून सापळा रचुन कारवाई केली जाते.

या सापळा कारवाईत पथकासह त्या त्या विभागाचे पंच देखील सहभागी असतात. गतवर्षी दोन गुन्हे दाखल झाले होते ते न्यायालयीन प्रविष्ट आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ फोन अथवा मोबाईल टोल फ्री १०६४ क्रमांक यावर संपर्क साधावा असे आवाहन उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा