जालना जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी…

जालना, १६ जानेवारी २०२४ : दि. २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने जालना जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण अनुषंगागाने जालना जिल्ह्यात विविध आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे जिल्हादंडाधिकारी यांनी पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दि. १६ जानेवारी २०२४, सायंकाळी ६ वाजेपासून ते दि. २९ जानेवारी २०२४, रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी जारी केलेल्या आदेशानुसार पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये शासकीय कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकु व शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या इतर वस्तू जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके अशा सहज हाताळता येतील अशा घातक वस्तू जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समूहाच्या भावना जाणूनबुजून दुखवण्याचा उद्देशाने, असभ्यतेने भाषण करणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नीतिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे काहीही कृत्य करणार नाही.

तसेच जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी जारी केलेल्या आदेशानुसार पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे. हा आदेश कामावरील कोणताही ‍अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे शांततापूर्वक पालन करण्याचे आवाहनही जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी नागरिकांना केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा