शिवसेनेचे ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप वर टीकास्त्र

मुंबई: देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात रण पेटले आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे. त्यात भाजपनं वीर सावरकरांच्या अपमानाचा मुद्दाही काढला आहे. नागरिकत्व कायदा आणि सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला लक्ष्य केलं आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या कोटास गुलाबाचे फूल खोचावे व मिरवावे तसे तुम्ही त्यांना मिरवत आहात. त्यामुळेच तुमचे सावरकरप्रेमाचे ढोंग साफ उघडे पडले आहे. महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा सगळा तुमचा प्रकार आहे. सावरकरांबाबत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकत्व कायद्यावरून देश का पेटला, याचं उत्तर आधी जनतेला द्या, असं आव्हान शिवसेनेनं भाजपला दिलं आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे महाराष्ट्रात काय करणार, असा प्रश्न राज्यातील विरोधी पक्षाला पडला आहे. हातातून सत्ता गेली. हातातोंडाशी आलेला घास गेला. त्यामुळे त्यांच्या मनावर आलेला ताण आम्ही समजू शकतो. अशा ताणतणावात असले प्रश्न पडतात. अर्थात महाराष्ट्रापुढे यापेक्षाही महत्त्वाचे आणि लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात आधीच्या सरकारने प्रश्नांचे डोंगर उभे केले आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारकातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाले आहे. अशी अनेक प्रकरणे रटरटत आहेत. त्यावरून लोकांचे लक्ष उडावे म्हणून विरोधी पक्ष फालतू उपद्व्याप करू पाहत असेल तर हे उद्योग त्यांच्या अंगलट येतील. विरोधी पक्षाने विधायक दृष्टिकोन ठेवावा. विरोधकांच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत अशा धमक्या देणाऱ्यांपैकी उद्धव ठाकरे नाहीत. अशा धमक्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. महाराष्ट्रातले हे वातावरण संपले आहे. भीमा-कोरेगाव दंगलीत फडणवीस यांचे सरकार कसे हतबल झाले होते याचा अनुभव देशाने घेतला आहे. महाराष्ट्राची नवी कुंडली महाविकास आघाडीचे सरकार मांडत आहे. विरोधकांनी त्यात अडथळे आणू नयेत. आम्हाला महाराष्ट्राच्या ११ कोटी नागरिकांची चिंता आहे. विरोधकांना हे मान्य नसेल व ते रिकामे असतील तर त्यांनी इतर राज्यांत लागलेली आग विझवायला जावे. आम्ही बंब पुरवू, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा