जालना, २४ फेब्रुवारी २०२४ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार ३ मार्च २०२४ रोजी जालना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ५ वर्षाखालील आपल्या बालकाला पोलिओचा डोस मिळेल याची पालकांनी खात्री करावी. नजिकच्या पोलिओ बुथवर जाऊन पोलिओ डोस घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. तसेच आरोग्य विभागाने पल्स पोलिओची मोहिम प्रभावीपणे राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. पाटील, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. गजानन म्हस्के, समाज कल्याण अधिकारी एस. के. भोजने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण पवार, आय. एम. अध्यक्ष एम. डी. अंबेकर, आय. ए. पी अध्यक्ष डॉ. जेथलिया आदिंसह वैद्यकीय अधिक्षक तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी