जालना, १३ मार्च २०२४ : आपण सत्तेत असलो आणि नसलो तरी मतदार संघातील विकास कामांसाठी सतत संघर्ष केला असून विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार कैलास गोरंटयाल यांनी आज रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना दिली.
सिडकोच्या ३० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीतून करण्यात येणाऱ्या जालना शहरातील जिजामाता चौक ते कोठारी स्कूल, रामनगर कॉलनी ते सिव्हील क्लब, बूऱ्हान नगर ते बायपास हायवे, हायवे – इदगाह ते सारवाडी रोड, मातोश्री लॉन्स ते सेंट्रल जेल आणि मातोश्री लॉन्स ते राजपूतवाडी या सहा रस्त्यांच्या सिमेंटीकरणाच्या कामांचा शुभारंभ आज आमदार कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ओमप्रकाश मंत्री, समीर अग्रवाल, राम सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना आमदार कैलास गोरंटयाल म्हणाले की, जालना शहर आणि मतदार संघाच्या विकासासाठी आपण नेहमीच संघर्ष करतो. राज्यात सत्तेत असताना आपण आपल्याच सरकारविरुद्ध संघर्ष केला होता याची आठवण करून देत आज आपण सत्तेत नसलो तरी मतदार संघाचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असून या कामांसाठी भरीव निधी खेचून आणला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी, जालना