पुणे- सोलापूर हायवेसाठी संपादित झालेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा-संजय पाटील भिमानगरकर

सोलापूर १३ ऑगस्ट २०२४ : पुणे-सोलापूर महामार्गासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे १४ वर्षांपासून थकीत असलेला मोबदला सुधारित कायद्याप्रमाणे तातडीने देण्यात यावा, अन्यथा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बाधित शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टेंभुर्णी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी म्हटले की, महामार्गासाठी जमीन २००९ मध्ये संपादित करण्याचे काम सुरू असताना तीन महिन्यांनी भूसंपदनाचा नवीन कायदा आला होता. यामुळे सुधारित कायद्याप्रमाणे शासनाने मोबदला द्यावयास हवा होता. मात्र शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करून सुधारित कायद्याप्रमाणे मोबदला दिला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी निवेदन देऊन वाढीव दर मिळावा अशी मागणी लवादाकडे केली होती. तसेच फळबागा,फळझाडे,विहीर,बोअर,घरे आदींचे व्यवस्थित मूल्यमापन केले नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

अधिकाऱ्यांनी केलेल्या अवाहनास प्रतिसाद देत आज ना उद्या वाढीव रक्कम मिळेल या भरवशावर व चांगले कार्य होत आहे.यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या मात्र १४ वर्षात त्यांच्या पदरी निराशा पडली. माढा तालुका बागायती क्षेत्र असलेला तालुका असून येथे ग्रीन झोन घोषित केले नाही. उलट मोहोळ तालुक्यात ग्रीन केल्यामुळे तेलंगवाडी येथे एका डाळींब झाडास ३५ हजार रुपये एवढा मोबदला मिळाला आहे.

फक्त २७ हजार रुपये गुंठा याप्रमाणे अत्यंत कमी मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसन्याचे काम शासनाने केले आहे. शेतकऱ्यांनी योग्य मोबदला देण्याची मागणी करीत भूसंपादन करण्यास विरोध केला असता पोलीस बळाचा वापर करून बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमीन फुकटात लाटण्यात आल्याचा आरोप ही शेतकऱ्यांनी केला आहे. या मागणीस १४ वर्षाचा काळ लोटला आहे.

लवादाकडे न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यास अधिकाऱ्यांनी मॅनेज करून सतत तारीख पे तारीख ची नीती अवलंबली. वेळकाढूपणा केला आहे. सोलापूर जिल्ह्यात या केसेस न चालविता पुणे जिल्ह्यात चालविल्या जातात. त्यातून शेतकऱ्यास जास्तीत जास्त त्रास देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले. सुमारे दहा हजार शेतकऱ्यांचा हा प्रलंबित प्रश्न असून मुख्यमंत्री यांना पुन्हा शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन समक्ष भेटून निवेदन देत आहोत. तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करणार आहे. अन्यथा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मोठे आंदोलन करणार असल्याचे संजय पाटील-भिमानगरकर यांनी सांगितलं.

या पत्रकार परिषदेस संजय पाटील-भिमानगरकर,अरुण लोकरे,राजाभाऊ ढवळे,समाधान ढवळे,धनाजी वाघ,ज्ञानदेव व्यवहारे,आबासो जवळगे,राजेंद्र वाघ,अनिल जगताप,बाबासो भोळेकर,शिवाजी वाघ,शंकर जगतापप्रकाश जगताप,नितीन मस्के,ग्यानबा जगताप,बलभीम इंगळे,पंकज ढवळे विठ्ठल नरुटे,भगवान ढवळे आदी रांझणी-भिमानगर,आढेगाव,शिराळ (टें),टेंभुर्णी, वेनेगाव,सापटने (टें),भुईंजे,आकुंभे,वरवडे आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : प्रदिप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा