सासवड, पुणे २१ नोव्हेंबर २०२४ : पत्रकार अनिल नामदेव खळदकर (वय ४३) यांचे दिनांक २० नोव्हेंबर रोजी अपघाती निधन झाले. अनिल हे अनेक वर्षांपासून पत्रकारीतेच काम करत होते. ते कुंभारवळण, सासवड येथील रहिवासी असून पुण्यातील न्यूज अनकट चॅनल मध्ये वरिष्ठ पत्रकार म्हणून सध्या ते कार्यरत होते.
काल सकाळी मतदान करून ते स्कूटर वरून कार्यालयीन कामासाठी निघाले असता, हडपसर परिसरातील गोंधळेनगर येथील मुख्य रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवरून त्यांची गाडी घसरून ते रस्त्यावर पडले. त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रक खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. अपघाता नंतर ससून रुग्णालयात पुढील सोपस्कार झाल्यानंतर कुंभारवळण, सासवड या त्यांच्या राहत्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनिल खळदकर हे अत्यंत मनमिळावू पत्रकार होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याने एक वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंब, नातेवाईक आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का पोहचला असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतेय. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे म्हणत त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलीय.