नॅशनल बुक ट्रस्टचे कार्यालय आता कायमस्वरूपी पुण्यात

पुणे २८ नोव्हेंबर २०२४ : नॅशनल बुक ट्रस्टचे (एनबीटी) कार्यालय आता मुंबई येथून कायमस्वरूपी पुण्यात होणार असून त्यांना मनपाची एका इमारतीची जागा देखील तात्काळ भाड्याने मिळालीय. त्यामुळे आता केवळ पुणे पुस्तक महोत्सवा पुरते काम होणार नसून वर्षभर एनबीटीचे काम चालणार आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्याची माहिती सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी एक फिल्म तयार करून महोत्सवात दाखवण्यात यावी. मुलांसाठी चित्रपट महोत्सवासोबत एक पुस्तकाधारित नाटक बसवण्यात यावे. पुस्तकाची आवड त्यातून मुलांमध्ये निर्माण होईल. पुणे शहर हे विविध क्षेत्रात अग्रेसर झाले आहे त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी होईल, असे मत माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने यावर्षीच्या पुस्तक महोत्सवाचे आयोजन १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. पुस्तक महोत्सवाचे कार्यालयाचे उद्घाटन आणि मांडवाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे , खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू पराग काळकर, एनबीटी संचालक युवराज मलिक, अध्यक्ष मिलिंद मराठे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, डीक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, डीईएस अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष अशोक पलांडे, जेष्ठ संपादक किरण ठाकूर, भाजप नेते माधव भंडारी, युवा सेना नेते किरण साळी, कुमार शंकर, सोमनाथ पाटील, प्रसेनजित फडणवीस, फर्ग्युसन महाविद्यालय प्राचार्य डॉ. विजय तडके, आरपीआय नेते मंदार जोशी, सुशील जाधव उपस्थित होते.

या प्रसंगी मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक शैक्षणिक संस्था इथे आहेत. पुणे पुस्तक महोत्सव यंदाही मोठ्या प्रमाणात होईल. मुलांसाठी चित्रपट महोत्सवा सोबत कथाकथन आणि पुस्तक वाचन कट्टा निर्माण करण्यात यावा. पुण्यात हा ऐतिहासिक महोत्सव होत असल्याचा अभिमान आहे’.

राजेश पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, हा महोत्सव कोणा एका व्यक्तीचा नाही तर पुणेकरांचा आहे. यामध्ये लोकसहभाग महत्वाचा असून यावर्षी चार विश्वविक्रम होणार आहे. चीनचे विक्रम मोडीत काढण्यात येणार असून साडेसात लाख लोक महोत्सवाला यंदा भेट देतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी पुणे पुस्तक महोसवात ५९८ स्टॉल असून ही क्षमता तीन दिवसात भरून आणखी ८० जण स्टॉल मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वेळी साडेअकरा कोटींची पुस्तकविक्री झाली असून यंदा ती दुप्पट होईल, अशी अपेक्षा आहे. परदेशातील लेखक देखील यंदा सहभागी होणार आहेत. यंदा देखील एक लाख पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

११ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ यादरम्यान ‘शांतता पुणेकर पुस्तक वाचत आहेत’ उपक्रम राबवला जाणार आहे. युवराज मलिक म्हणाले, ‘पुणे शहरात साहित्याबद्दल जागरूकता आहे. मागील वेळी पुस्तक महोत्सवामध्ये २०० स्टॉल होते. यंदा त्याची संख्या तिप्पट वाढवून ६०० झाली तरी देखील अनेकजण विचारणा करत आहेत. पुढील वेळी हा महोत्सव परदेशात घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे. महोसवात देशभरातील अनेक लेखक येऊन विविध भाषांत त्यांचे विचार मांडतील. पुणे पुस्तक महोत्सव आणि एनबीटी यांची दोन स्वतंत्र कार्यालये असतील, असे आयोजकांकडून सांगण्यात आलय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले, प्रसेनजीत फडणवीस यांनी आभार मानले.

न्यूज अनकट पुणे प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा