पुणे २३ जानेवरी २०२५ : राज्य सरकार मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचार आणि इतर अनेक गंभीर आरोप आहेत. खासियत म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदारच या मंत्र्यांवर आरोप करत आहेत. यावर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, “सरकारने जनाची नसेल, तर मनाची लाज बाळगून डाग लागलेल्या मंत्र्यांचे राजीनामे तत्काळ घ्यावेत” अशी मागणी केलीय. सरकारच्या अपारदर्शकतेवर गंभीर आक्षेप घेत, पटोले यांनी सध्याच्या सरकारला ‘महाराष्ट्र लुटणारे’ आणि ‘खोटे एन्काऊंटर करणारे’ सरकार अशी उपमा दिलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, उच्च न्यायालयानेही सत्ताधारी सरकारच्या कारभारावर शिक्कामोर्तब केलय. पटोले यांच्या या टीकेला खूप महत्त्व दिलं जात आहे कारण हे वक्तव्य सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांवर असलेल्या आरोपांवर आधारित आहे, ज्याचे गंभीर राजकीय परिणाम होऊ शकतात.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरही तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याच्या योजनेत काही बदल गुपचूप केले गेले. जेणे करून भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून कृषिमंत्र्यांनी केलेल्या बदलामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. “शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम सरकारने केले आहे,” अशी त्यांनी टीका केलीय.
अशातच नाना पटोले यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी भेट घेतली. “विधिमंडळाच्या समित्याबाबतची माहिती विधानसभा अध्यक्षांना द्यायची आहे. विरोधी पक्षनेत्याच्या नावाची चर्चा देखील करायची आहे.” या भेटीत पवार साहेबांसोबत महत्त्वाच्या धोरणात्मक बाबींवर चर्चा केली, असे त्यांनी सांगितले. यावेळी पटोले यांनी आपल्या पक्षाच्या भविष्यातील बदलावर देखील भाष्य केले. त्यानुसार, “आमच्या पक्षात लोकशाही आहे आणि माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे, पक्षातील संघटनात्मक बदलांसाठी वरिष्ठ नेत्यांना मी पत्र दिलेले आहे.” हे सांगून पटोले यांनी आगामी काळात पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याचा इशारा दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे