पिंपरी ९ फेब्रुवारी २०२५ : कडक थंडीत कुडकुडत, डोळ्यात कामाची आस अन् चेहऱ्यावर चिंतेच्या काळ्या छाया घेऊन शेकडो मजूर पिंपरीतील मजूर अड्ड्यावर उभे आहेत. हाताला रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या काही वर्षांत मजूर अड्ड्यांवरील गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागातून शहरात आलेल्या मजुरांना काम मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा करावी लागते. सकाळी ९ ते १२ या वेळेत काम देणारे कंत्राटदार येतात, तेव्हा त्यांच्याभोवती कामगारांचा गराडा पडतो. मिळेल ते काम, मिळेल तो मोबदला, पण काम द्या! अशी त्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे.
महिला कामगारांना तर पुरुषांपेक्षा कमी मोबदला मिळतो. पुरुषांना दिवसाला ८०० ते १३०० रुपये मिळतात, तर महिलांना ६०० ते ८०० रुपये. शिवाय, कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहे नाहीत. ठरलेला मोबदला मिळेल याचीही खात्री नसते. काम झाल्यावर कमी पैसे देणे, दमदाटी करणे, मारहाण करणे हे नित्याचेच झाले आहे.
बांधकाम, रंगकाम, सुतारकाम यांसारखी कष्टाची कामे करणारे हे मजूर अनेकदा अपघातांना बळी पडतात. पण ठेकेदार त्यांची जबाबदारी घेत नाहीत. उपचाराचा खर्चही त्यांना स्वतःच करावा लागतो. एक दिवस काम नाही मिळाले, तर दुसऱ्या दिवशी घरी चूल पेटणार नाही, अशी त्यांची स्थिती आहे.
एमआयडीसीतील कंपन्यांना मजूर हवे आहेत, पण त्यांच्या हक्कांची कोणतीही हमी नाही. कामगारांच्या या दयनीय अवस्थेकडे सरकारचे लक्ष नाही. कधीतरी सरकारी यंत्रणा याकडे लक्ष देईल? रोजगार आणि सुरक्षिततेची हमी मिळेल? की रोज हाताला काम मिळेल की नाही, या चिंतेतच त्यांना दिवस काढावे लागतील?
न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे