वेल्हे, १० फेब्रुवारी २०२५ : ऐतिहासिक तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. रणजित मोहनदास शिंदे (वय ४४, रा. वारजे, पुणे, मूळ गाव सोनगाव, जि. सातारा) असे या पर्यटकाचे नाव आहे.
शनिवारी सायंकाळी रणजित शिंदे आणि त्यांचे सहकारी फजीलत खान तोरणागड सर करण्यासाठी आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास रणजित यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि ते बेशुद्ध झाले. फजीलत यांनी तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केली.वेल्हे पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक गिर्यारोहकांना संपर्क केला. पोलिस कॉन्स्टेबल रोहित मरभळ, युवराज सोमवंशी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथकातील सदस्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
रणजित शिंदे यांना गडाच्या खाली आणण्यासाठी स्थानिक तरुणांनीही मोलाची मदत केली. अखेर पहाटे पाचच्या सुमारास त्यांना पार्किंगपर्यंत पोहोचवण्यात आले. तत्पूर्वी, १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली होती.


डॉक्टरांनी तपासणी करून रणजित शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. गिर्यारोहणादरम्यान हृदयावर येणाऱ्या ताणामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे साहसी खेळ, मॅरेथॉन किंवा ट्रेकिंग करण्यापूर्वी आवश्यक वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
रणजित शिंदे हे वारजे परिसरात दूध व्यवसाय करत होते. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे ट्रेकिंगदरम्यान वैद्यकीय तपासणी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे