पॅरिस १२ फेब्रुवारी २०२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील उद्योजकांना भारतात गुंतवणुकीसाठी जोरदार आमंत्रण देत भारत-फ्रान्स व्यापार संबंधांना नवी ऊर्जा दिली आहे. “भारतात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे आणि म्हणूनच गुंतवणूकदारांसाठी येथे अनुकूल वातावरण आणि धोरणात्मक सातत्य आहे, असे त्यांनी आश्वासन दिले.
भारत-फ्रान्स भागीदारीची उंची


या परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. “तुम्ही केवळ व्यवसाय करत नाही, तर भारत-फ्रान्सच्या धोरणात्मक भागीदारीलाही मजबूत करत आहात,” असे मोदी म्हणाले. गेल्या दोन वर्षांत मोदी आणि मॅक्रॉन यांची ही सहावी भेट आहे, यावरून दोन्ही देशांमधील संबंधांचे महत्त्व अधोरेखित होते.
तंत्रज्ञान आणि ‘मेक इन इंडिया’चा बोलबाला :


मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अवकाश तंत्रज्ञान आणि ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून भारताने केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला. सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञानात भारत मोठी झेप घेत आहे, आणि संरक्षण क्षेत्रात ‘मेक फॉर द वर्ल्ड’ला प्रोत्साहन दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अणुऊर्जा क्षेत्रात भारताचे 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा उत्पादन करण्याचे ध्येय आहे, ज्यामुळे हरित ऊर्जा क्षेत्रात भारत जगाला दिशा देईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
भारताची जागतिक गुंतवणूकदारांसाठी ‘हॉटस्पॉट’ ओळख :
भारत आज जागतिक गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक बनला आहे. मजबूत धोरणे, जलद निर्णय प्रक्रिया आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे भारत व्यवसायिकांसाठी मोठी संधी घेऊन आला आहे, असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.
“भारतात गुंतवणूक करा आणि भविष्य घडवा!” या पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला जगभरातील गुंतवणूकदार सकारात्मक प्रतिसाद देतील, यात शंका नाही. भारत-फ्रान्स यांच्यातील हे दृढ संबंध केवळ दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर जागतिक स्तरावरही महत्त्वपूर्ण ठरतील.
न्युज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे