सिंहगड रस्त्यावरील कुक्कुटपालन केंद्रांमध्ये जीवाणू व विषाणू आढळले, खासगी आरओवरील बंदी उठली!

24

पुणे १८ फेब्रुवारी २०२५: गेल्या महिन्यात पुणे शहरात गुईलेन बॅरी सिंड्रोम (GBS) रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन सतर्क झाले होते. या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावरील कुक्कुटपालन केंद्रांमधील नमुन्यांची तपासणी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या केंद्रांतील पाणी, माती आणि कोंबड्यांच्या विष्ठेत जीवाणू आणि विषाणू आढळले आहेत.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेच्या (NIV) अहवालानुसार, कुक्कुटपालन केंद्रांमधून संकलित केलेल्या २९ पाण्याच्या नमुन्यांपैकी २३ नमुने कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी पॉझिटिव्ह तर ५ नमुने नोरोव्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. यामुळे परिसरातील पाणी दूषित होत असल्याचा संशय बळावला आहे.

खासगी आरओ प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास परवानगी!

दूषित पाण्यामुळे GBS चा प्रादुर्भाव वाढत असल्याचा संशय बळावल्यानंतर महापालिकेने धायरी, किरकटवाडी, सणसवाडी आणि नांदेड गावांतील १९ खासगी आरओ प्रकल्प बंद केले होते. मात्र, आता या प्रकल्पांवरील बंदी उठवण्यात आली असून, काही महत्त्वाच्या अटींसह त्यांना कार्यरत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नियमांचे काटेकोर पालन आवश्यक!

महापालिकेने खासगी आरओ प्रकल्पांसाठी नवीन नियमावली तयार केली आहे. या प्रकल्पांना पुढील अटींचे पालन करणे बंधनकारक असेल:

  • महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक
  • नियमित देखभाल आणि दुरुस्ती करणे गरजेचे
  • राज्य सार्वजनिक आरोग्य शाळेकडून पाण्याची तपासणी बंधनकारक
  • महापालिकेचे आरोग्य निरीक्षक वेळोवेळी पाण्याचे नमुने तपासतील
  • पाणी दूषित आढळल्यास तत्काळ प्रकल्प बंद करण्यात येईल

आरोग्य विभाग सतर्क!

महापालिकेचे आरोग्य निरीक्षक आणि पशुसंवर्धन विभागाकडून नियमित तपासणी केली जाणार आहे. यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवता येईल आणि भविष्यात GBS किंवा तत्सम आजारांचा प्रादुर्भाव रोखता येईल.

आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. निना बोराडे यांनी सांगितले की, “प्रदूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. कोणत्याही आरओ प्रकल्पाने नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.”

सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांनी अधिक जागरूक राहावे, स्वच्छ पाण्याचा वापर करावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा