स्वराज्यनिर्मितीच्या वाटचालीत पदोपदी मार्गदर्शक ठरलेली ही राजमुद्रा समोर ठेवूनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभार चालवला. या राजमुद्रेत स्वत: शहाजीराजेंनीच ‘विश्ववंदिता’ या शब्दाचं प्रयोजन केलं होतं. आणि खरंच शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य अवघ्या विश्वाला वंदनीय ठरलं.
– विश्वजीत राळे, न्यूज अनकट प्रतिनिधी


रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपल्या सर्वांना माहितीये. या राजमुद्रेत सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य रयतेचं हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांनी स्थापित केलं. अगदी त्या प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे शिवरायांचं हे स्वराज्य वाढत गेलं. स्वराज्यनिर्मितीच्या वाटचालीत पदोपदी मार्गदर्शक ठरलेली ही राजमुद्रा समोर ठेवूनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभार चालवला. या राजमुद्रेत स्वत: शहाजीराजेंनीच ‘विश्ववंदिता’ या शब्दाचं प्रयोजन केलं होतं. आणि खरंच शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य अवघ्या विश्वाला वंदनीय ठरलं.
शिवमुद्रेचा अर्थ


पूर्वीच्या काळी प्रत्येक राजाची आपापली स्वत:ची अशी स्वतंत्र मुद्रा असायची. त्या काळी जे वेगवेगळे खलिते, पत्रं धाडली जायची, त्या पत्रांची विश्वासार्हता पटली जावी, म्हणून त्या पत्रांवर त्या त्या राजाची राजमुद्रा उमटवली जायची. राजमुद्रेवरून हे पत्र कोणाचं याची माहिती मिळायची. इतिहासातील या राजमुद्रांपैकी आपल्या सर्वांना शिरसावंद्य असणारी राजमुद्रा म्हणजे छत्रपती शिवरायांची राजमुद्रा, जिला आपण ‘शिवमुद्रा’ असंदेखील संबोधतो.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
म्हणजेच, “प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंदनीय असणारी, शहाजीराजेंचा पुत्र शिवाजीची मुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसत आहे”, असा या राजमुद्रेवरील मजकुराचा अर्थ.
शहाजीराजे आणि शिवमुद्रा


संस्कृत भाषेत असलेली ही राजमुद्रा अष्टकोनी आकारात साकारण्यात आली. शहाजीराजेंनी बंगळुरला असताना जिजाऊंना बाल शिवबांसहित पुणे प्रांताचा कारभार सांभाळण्यासाठी पाठवलं. शिवराय त्यावेळी अवघ्या १२ वर्षांचे होते. त्यावेळी शहाजीराजांनी ही राजमुद्रादेखील त्यांच्यासमवेत पाठवली, असा उल्लेख शिवभारत या ग्रंथात आढळून येतो.
भाषेचा राजमुद्रेवर प्रभाव
शिवकाळापूर्वीही राजमुद्रा अस्तित्वात होत्या, मात्र त्या फारसी भाषेत होत्या. तत्कालीन फारसी भाषेचा प्रभाव या राजमुद्रांवर दिसून येतो. शिवाजी महाराजांचे पिता शहाजीराजेंची राजमुद्रादेखील फारसी भाषेत होती. मात्र शिवरायांची ही राजमुद्रा जिला आपण शिवमुद्रा असं संबोधतो ती संस्कृत भाषेत साकारण्यात आली. शहाजीराजे यांना संस्कृत भाषेची उत्तम जाण होती. आपली भाषा, आपली संस्कृती टिकली जावी, हा त्यामागचा शहाजीराजांचा उद्देश आपल्याला यातून दिसून येतो.
शिवमुद्रेचा वापर


स्वराज्याचा कारभार चालवताना जो पत्रव्यवहार केला जाई, त्यावेळी ही शिवमुद्रा वापरली जायची. पत्राच्या अगदी सुरूवातीला या राजमुद्रेचा एक मुख्य मुद्रा म्हणून वापर केला जात असे. मात्र आपल्यापेक्षा ज्येष्ठांना जेव्हा आदरपूर्वक पत्रं पाठवली जायची, तेव्हा मात्र ही राजमुद्रा पत्राच्या शेवटी उमटवली असल्याचं दिसून येतं. यावरूनच एखादा आदेश जर असेल, तर ही राजमुद्रा पत्राच्या अगदी सुरूवातीला आणि जेव्हा एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला आदरपूर्वक पत्रव्यवहार केला जाई, त्यावेळी मात्र ही राजमुद्रा पत्राच्या अखेरीस उमटवली जायची, असं इतिहास संशोधकांनी म्हटलंय.
शिवाजी महाराजांच्या अन्य मुद्रा
या शिवमुद्रेसोबतच शिवाजी महाराजांच्या आणखीही मुद्रा अस्तित्वात होत्या. पत्रव्यवहार करताना राजमुद्रेसोबतच आणखी एक मुद्रादेखील उमटवली जायची, ती म्हणजे ‘मर्यादेय विराजते’ असा मजकूर असलेली मर्यादा मुद्रा. नावाप्रमाणेच पत्राच्या अखेरीस ही मुद्रा उमटवली जायची. एकदा लिहिलेल्या पत्रात कोणीही बदल करू नये, आणि जर कोणी बदल केलाच, तर तो लक्षात यावा, हा या मर्यादा मुद्रेमागचा उद्देश.


शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला आणि महाराज या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती जाहले, त्यावेळी महाराजांनी आणखी एक राजमुद्रा बनवली असल्याचं समोर आलंय. महादेव मुद्रा असं या मुद्रेला संबोधलं जातं.
मात्र राज्यकारभारासाठी शिवमुद्राच वापरली असल्याचं तत्कालीन पत्रांवरून समोर आलंय. तर अशी ही शिवरायांची राजमुद्रा… शिवमुद्रा, लोकांच्या कल्याणासाठी असलेली, आजही विश्ववंदनीय ठरणारी!