हडपसरकरांची एकच मागणी – मंत्र्यांचे दर आठवड्याला दौरे व्हावेत!

13

पुणे २६ फेब्रुवारी २०२५: हडपसरवासीयांना मंत्र्यांच्या दौऱ्याची चांगलीच सवय लागली आहे! कारण जिथे मंत्री येणार, तिथे प्रशासनाचा तत्परतेने झपाटा सुरू होतो. नुकत्याच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यानंतर हडपसरच्या रस्त्यांवर हा बदल पहायला मिळाला. त्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली. रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात आले, खड्ड्यांची डागडुजी झाली, आणि वाहतूक व्यवस्थाही शिस्तबद्ध झाली. मात्र, मंत्री निघून गेल्यावर पुन्हा जुनी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मंत्र्यांच्या दौऱ्याने प्रशासनाला आले शहाणपण!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमुळे हडपसरच्या रस्त्यांवर प्रशासनाने वेगाने काम केले. महापालिकेने बाजारपेठांतील फळभाजी विक्रेते, पुलाखाली बसलेली दुकाने आणि अनधिकृत शेड्स तातडीने हटवल्या. रस्त्यांच्या रंगरंगोटीपासून ते वाहतूक नियमनापर्यंत प्रत्येक गोष्टीला गती मिळाली. पोलिसांनीही कडक कारवाई करत अनधिकृत पार्किंग हटवले.

‘दर आठवड्याला मंत्री आले तरच शहर स्वच्छ राहील’

या तात्पुरत्या सुधारणा पाहून नागरिक आश्चर्यचकित झाले. “जर मंत्र्यांचे दौरे दर आठवड्याला होत असतील, तरच प्रशासनाला जाग येईल!” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. प्रशासनाची ही तत्परता कायम राहावी आणि हडपसरमधील अतिक्रमण तसेच वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी सुटावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सध्या परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याने हडपसरकरांचा प्रश्न कायम आहे – स्वच्छ आणि सुशोभित शहरासाठी फक्त मंत्र्यांच्या दौऱ्यांची गरज आहे का?

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा