पुणे, ३ मार्च २०२५: पुणे महापालिका भवनात सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या येण्यावर आता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महापालिका कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि मानधन तत्त्वावरील कामगारांच्या सुट्टीच्या दिवशीच्या प्रवेशावर आता सुरक्षा विभागाची करडी नजर असणार आहे. संबंधित विभागाच्या खातेप्रमुखाचे नावानिशी पत्र असल्याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला महापालिका भवनात प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती महापालिका सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिली आहे.
स्वारगेट येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सुट्टीच्या दिवशी महापालिका भवनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
सुरक्षा विभागाने सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय परिसरातील उद्याने, शाळा, दवाखाने या ठिकाणी काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. आपल्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्ष कसे राहावे, भामट्या लोकांना कसे ओळखावे आणि त्यांना परिसरातून हाकलून पोलिसांच्या ताब्यात कसे द्यावे, याचे प्रशिक्षण सुरक्षा रक्षकांना देण्यात आले आहे, असे राकेश विटकर यांनी सांगितले.
या निर्णयामुळे सुट्टीच्या दिवशी विनाकारण महापालिका भवनात प्रवेश करणाऱ्यांवर चाप बसणार आहे. महापालिकेच्या सुरक्षेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे