Pune Metro Plan : पुणेकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल ९,८९७ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन महत्त्वाच्या मार्गिकांचा समावेश आहे. त्यामुळे पुणेकरांना शहराच्या कानाकोपऱ्यात सहज आणि जलद प्रवास करता येणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. १०) राज्याचा अकरावा अर्थसंकल्प सादर करताना या प्रकल्पाची घोषणा केली. सध्या पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामं जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भाग मेट्रोने जोडला गेला आहे. मात्र, शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून आता आजूबाजूच्या भागांनाही मेट्रोने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण २३ किलोमीटरचा नवीन मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे सध्या दररोज दीड लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतात, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्वारगेट ते कात्रज या मार्गिकेला यापूर्वीच केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आता खडकवासला, हडपसर-खराडी आणि वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांच्या प्रस्तावालाही लवकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मेट्रोच्या नव्या मार्गिकांबरोबरच पुणे-शिरूर महामार्गावर ५४ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग (एलिव्हेटेड हायवे) बांधण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गासाठी ७ हजार ५१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
पुणे मेट्रोचा विस्तार आणि सुधारणांमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि पुणेकरांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल, यात शंका नाही.
न्यूज अनकट, प्रतिनिधी सोनाली तांबे