Gas cylinder Sphot : छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई परिसरात सोमवारी (१० मार्च) संध्याकाळी गादी दुकानाला आग लागल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील पाच दुकानांना सुद्धा आग लागली होती. यामुळे आगीत वेल्डिंग दुकानातील गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटचा आवाज तब्बल दोन किलोमीटरपर्यंत ऐकू आला, तर तुटलेल्या सिलेंडरचे अवशेष पाचव्या मजल्यावर आढळले. या आगीत सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य रस्त्यावर असलेल्या अशोक हिवाळे यांच्या गाळ्यात दूध डेअरी, चप्पल विक्री, फॅब्रिकेशन आणि गादी विक्री अशी पाच दुकाने होती. संध्याकाळच्या सुमारास गादी विक्रीच्या दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात कापूस आणि गाद्या असल्याने आगीने काही मिनिटांत रौद्ररूप धारण केले आणि आग शेजारील दुकानांपर्यंत पसरली.
नागरिकांचे प्रयत्न अपयशी :
आगीच्या भीषणतेमुळे परिसरातील नागरिकांनी ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. स्फोट झाल्यानंतर अर्ध्या तासाने अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचली, तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी