चॅम्पियन ऑफ दि चॅम्पियन!

20
Champion of the Champions!
चॅम्पियन ऑफ दि चॅम्पियन!

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. भारताच्या विजयात रोहित शर्माने अप्रतिम खेळी खेळली. ७६ धावा काढून रोहितला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. भारतीय संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले आहे. दुबईच्या मैदानावर भारताने पराक्रमाची अनेक शिखरे पादाक्रांत केली.

भारत चॅम्पियन होण्यात रोहित शर्माची कर्णधार आणि फलंदाजी महत्त्वाची होती. रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांचा योग्य वापर केला. मैदानावर कर्णधार म्हणून रोहितने अचूक डावपेच आखत न्यूझीलंडच्या संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. रोहितने शानदार फलंदाजी करताना ७६ धावांची खेळी करत संघाला विजयाच्या दारात नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने सुरुवातीपासूनच वेगवान धावा केल्या. त्यामुळे इतर फलंदाजांचे दडपण दूर झाले आणि अखेरीस भारताने चार विकेटस्‌ राखून सामना जिंकण्यात यश मिळवले. कुलदीप यादवच्या दोन महत्त्वाच्या विकेट सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. कुलदीपने सर्वात धोकादायक फलंदाज रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांना बाद केले. त्यामुळे सामन्याचे पारडेच फिरले. आपल्या पहिल्या दोन षटकांत कुलदीपने दोन महत्त्वाचे बळी घेत न्यूझीलंडला बॅकफूटवर आणले. भारताच्या मधल्या फळीत फलंदाजी करून श्रेयस अय्यरने दाखवून दिले, की तो किती चांगला फलंदाज आहे.

श्रेयस अय्यरने ६२ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. कोहली आणि रोहित बाद झाल्यानंतर भारताला मोठा धक्का बसला होता. अशा वेळी अय्यरची खेळी महत्त्वपूर्ण होती. भारताला विजयाच्या दारात नेण्यात अक्षर पटेलसह अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी मधल्या फळीत ६१ धावांची भागीदारी केली. केएल राहुलनेही संपूर्ण स्पर्धेत चांगली फलंदाजी केली. मधल्या फळीत त्याच्यासारखा फलंदाज असणे भारतासाठी फायदेशीर ठरले. राहुलने सामन्यात ३४ धावांची नाबाद खेळी केली आणि एका बाजूने तो क्रीझवर टिकून राहील याची खात्री दिली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय फिरकी गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. विशेषत: वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी आपल्या गूढतेने विरोधी फलंदाजांना अडचणीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वरुणने अंतिम सामन्यात ४५ धावांत दोन विकेट घेतल्या, तर कुलदीप यादवनेही दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय जडेजाने एक विकेट घेतली. म्हणजे फिरकीपटूंनी न्यूझीलंडचे पाच बळी घेतले. भारताने १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डॅरिल मिशेल (६३) आणि मायकेल ब्रेसवेल (५३) यांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले. रोहित शर्मानंतर शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी मॅचविनिंग इनिंग्स खेळल्या. भारताने सहा चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना चार गडी राखून जिंकला.

तत्पूर्वी न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली होती. विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी पहिल्या विकेटसाठी झटपट ५७ धावा केल्या; मात्र वरुण चक्रवर्तीने पहिली विकेट घेतल्यानंतर कुलदीप यादवने रचिन रवींद्र (३७) आणि केन विल्यमसन (११) यांना लवकर बाद करून किवी संघावर दडपण आणले. २५२ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी विक्रमी भागीदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पहिल्या विकेटसाठी खेळलेली ही तिसरी शतकी भागीदारी आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने आपल्या मधल्या फळीतील फलंदाजांवरील दडपण मोठ्या प्रमाणात कमी केले. भारताची मधली फळी मजबूत आहे. रोहित-शुबमनने चांगली भागीदारी करूनही भारतावर दबाव होता; मात्र मधल्या फळीत प्रत्येक सामन्यात चांगली खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरने महत्त्वपूर्ण ४८ धावा केल्या.

अक्षर पटेलने त्याच्यासोबत २९ धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी खेळली. हार्दिक पांड्यानेही १८ चेंडूत १८ धावांची खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. केएल राहुलने ३४ धावांची नाबाद खेळी खेळली. या सामन्यात फिरकी गोलंदाजांनी भारताने ३८ षटकात १४४ धावांत ५ बळी घेतले. यामुळे किवींचा डाव २५१ धावांवर थांबला. फिरकी गोलंदाजांसाठी खेळपट्टी उपयुक्त होती. रोहित शर्माने सुरुवातीलाच वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने ४१ चेंडूत अर्धशतक केले. गिलला मोकळेपणाने खेळता आले नाही; पण बॅटिंग पॉवरप्लेमध्ये भारताने ६४ धावा केल्या. त्यामुळे जेव्हा फिरकी गोलंदाज आले, तेव्हा विकेट पडल्यानंतरही भारताची धावगती फारशी खाली आली नाही. केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने शतक झळकावले. भारताविरुद्धच्या गेल्या सामन्यातही त्याने चांगली खेळी केली होती; मात्र कुलदीप यादवने त्याला रोखले. त्याने येताच चांगले फटके खेळले; पण १४ चेंडूत ११ धावा केल्यानंतर तो झेलबाद झाला. रोहित आणि गिल यांनी भारतीय संघासाठी १०५ धावा जोडल्या; पण पुढच्या १७ धावा करताना रोहित, गिल आणि विराट बाद झाले.

त्या वेळी किवी फिरकीपटूंचा पूर्ण दबदबा होता. यानंतर श्रेयस आणि अक्षरची जोडी टिकली. दोघांमध्ये ७५ चेंडूत ६१ धावांची भागीदारी झाली. यासह भारतीय संघाने सामन्यावर वर्चस्व राखले. फायनलमधील पराभवाचा सर्वात मोठा खलनायक केएल राहुलला समजले जात होते. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी केली. अंतिम फेरीतही तो सहाव्या क्रमांकावर आला आणि त्याने नाबाद राहत सामना जिंकून देणारी खेळी खेळली. फिरकी गोलंदाजांचाही त्याने धैर्याने सामना केला.

भारतीय संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. २००२ च्या मोसमात भारतीय संघ पहिल्यांदा चॅम्पियन बनला होता. त्या वेळी त्याने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे जेते पटकावले होते. त्यानंतर महेंद्रसिंह  धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१३ मध्ये चॅम्पियन बनला. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. ‘टीम इंडिया’ चॅम्पियन्स ट्रॉफीचा सर्वात यशस्वी संघ बनला आहे. आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा नऊ वेळा आयोजित करण्यात आली असून ‘टीम इंडिया’ पाच वेळा अंतिम सामन्यात पोहोचली आहे. ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ची पहिली स्पर्धा १९९८ मध्ये बांगला देशमध्ये खेळली गेली. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा ४ गडी राखून पराभव करून ही स्पर्धा जिंकली. विश्वचषकाव्यतिरिक्त, ही पहिलीच स्पर्धा होती ज्यात त्या वेळचे सर्व कसोटी खेळणारे देश सहभागी झाले होते.

यामुळेच यजमान बांगला देशला यात सहभागी होता आले नाही. भारत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. तिथे भारतीय संघाला वेस्ट इंडिजकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर, पुढील चॅम्पियन्स ट्रॉफी २००० मध्ये केनियाची राजधानी नैरोबी येथे खेळली गेली. भारताचा चार गडी राखून पराभव करत न्यूझीलंड या स्पर्धेचा विजेता ठरला. सौरभ गांगुलीची ११७ धावांची खेळीही संघाच्या विजयासाठी अपुरी ठरली. २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा श्रीलंकेत खेळली गेली. यामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला; मात्र पावसामुळे अंतिम सामना झाला नाही. दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. ‘टीम इंडिया’ केवळ तीन वेळा बाद फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही.

२००४, २००६ आणि २००९ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला होता. २००४ मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडचा दोन विकेट्सने पराभव करून पहिली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मार्कस ट्रेस्कोथिकचे शतकही आपल्या संघाला ट्रॉफी जिंकून देऊ शकले नाही. २००६ साली भारतात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते; पण ‘टीम इंडिया’ ग्रुप स्टेजमध्ये ३ पैकी २ सामने हरल्याने स्पर्धेतून बाहेर पडली होती. स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईत आयोजित करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा आठ गडी राखून पराभव करून त्यांचे पहिले चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद पटकावले. २००९ साली दक्षिण आफ्रिकेत प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

‘टीम इंडिया’ पुन्हा एकदा ग्रुप स्टेजमधून बाहेर पडली. न्यूझीलंडचा सहा गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. तेव्हापासून ‘टीम इंडिया’ सतत फायनल खेळत आहे. या तीन फायनलमध्ये, २०१७ मध्ये केवळ पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा पराभव झाला आहे. २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ने इंग्लंडला त्याच्याच मैदानावर पराभूत करून दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली होती; पण २०१७ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाला अंतिम फेरीत त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करता आली नाही. पाकिस्तानने प्रथमच फायनलमध्ये भारताचा पराभव केला. एकूणच, ‘टीम इंडिया’ने नऊपैकी पाच फायनल मॅच खेळल्या आहेत आणि तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद दोनदा जिंकले आहे. आता पुढील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२९ मध्ये भारतात होणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंची ज्या पद्धतीने तयारी केली जात आहे, त्यामुळे संघ पुन्हा एकदा स्पर्धेत चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे!

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाने विजयाचा अनोखा विक्रम केला. कोणत्याही एका ठिकाणी पराभव न करता सलग सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने येथे सलग दहा सामने जिंकले आहेत. गेल्या ११ सामन्यांतील एक सामना बरोबरीत राहिला आहे; मात्र न्यूझीलंड संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. ड्युनेडिनमध्ये त्याने दहा सामने जिंकले आहेत. दुबईत फिरकीपटूंची जादू पाहायला मिळाली. या सामन्यात फिरकीपटूंनी एक मोठा विश्वविक्रम मोडला. ‘आयसीसी टुर्नामेंट’च्या एक दिवशीय सामन्यात सर्वाधिक षटके टाकण्याचा विक्रम फिरकीपटूंनी केला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात फिरकीपटूंनी एकूण ७३ षटके टाकली. यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत फिरकीपटूंनी ६५.१ षटके टाकली होती.

हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दुबईत भारतीय संघाने अनेक विक्रमाची नोंद केली. सांघिकतेचे प्रदर्शन घडवित मावळ्यांनी इतिहास रचला. या विजयाचे श्रेय कर्णधार रोहित शर्मा तसेच संपूर्ण संघाला जाते; मात्र प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाच्या पाच निर्णयांचाही भारताच्या विजयात मोलाचा वाटा आहे. यातील काही निर्णयांवर स्पर्धेच्या सुरुवातीलाच टीका झाली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात दोन बदल करण्यात आले होते. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा समावेश करण्यात आला. बॅकअप सलामीवीराला वगळून वरुण चक्रवर्तीचा पाचवा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला. या निर्णयावर चौफेर टीका झाली; मात्र दुबईत भारतीय फिरकीपटू प्रभावी ठरले.

वरुणशिवाय कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हेही संघात होते. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही भारतीय संघात होता; मात्र पाचही सामन्यांमध्ये तो बेंचवर बसला. संघ व्यवस्थापनाने केएल राहुलवर विश्वास व्यक्त केला. राहुलची बॅटही महत्त्वाच्या वेळी तळपली. अंतिम सामन्यात राहुलने ३३ चेंडूत ३४ धावा करून नाबाद राहिला. उपांत्य फेरीतही केएल ४२ धावा करून नाबाद राहिला. केएलने बांगला देशविरुद्धही ४१ धावांची नाबाद खेळी खेळली होती. पहिल्या दोन गट सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीला संधी मिळाली नाही. यानंतर वरुणला न्यूझीलंडविरुद्ध अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले आणि त्याने स्वतःला पुन्हा सिद्ध केले. वरुणने न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या ग्रुप स्टेज मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या होत्या. यानंतर वरुण चक्रवर्तीला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर अंतिम फेरीत किवी संघाविरुद्ध २-२ असे यश मिळाले. भारतीय संघात अर्शदीप सिंगसारखा वेगवान गोलंदाज होता. यानंतरही संघाने पहिल्या दोन सामन्यात मोहम्मद शमी आणि हर्षित राणासोबत मैदानात उतरले. यानंतर राणालाही बाहेर बसवण्यात आले आणि भारतीय संघ एका वेगवान गोलंदाजासह खेळत राहिला.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात फिरकीने जिंकण्याचा फॉर्म्युला होता. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध फिरकीचा चांगला वापर केला आणि त्यामुळे विजेतेपद पटकावले. भारताने सात आयसीसी विजेतेपद पटकावली आहेत. सर्वाधिक आयसीसी विजेतेपदे जिंकणाऱ्या संघांच्या यादीत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत दहा विजेतेपदे जिंकली आहेत. भारत सात विजेतेपद जिंकून दुसऱ्या स्थानी आहे. वेस्ट इंडिजचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत  आयसीसीची पाच विजेतेपदे जिंकली आहेत, तर पाकिस्तान आणि श्रीलंका संघ या यादीत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंकेने आतापर्यंत ३-३ वेळा आयसीसीचे जेतेपद पटकावले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,भागा वरखाडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा