Hadapsar Terminals : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा भार वाढल्यामुळे आता हडपसर टर्मिनसचा विकास करण्यात येत आहे. या टर्मिनसवर प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीची बस स्थानकासाठी जागा मिळावी अशी मागणी पीएमपी प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. हडपसर टर्मिनसवर पीएमपी बस स्थानकासाठी जागा मिळाल्यास प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरून मोठ्या प्रमाणात गाड्या धावत असल्याने या स्थानकावर प्रवाशांचा भार वाढला आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या हडपसर टर्मिनल्स मधून सोडण्यात येत आहेत. हडपसर टर्मिनल्स सुरू होऊन आता तीन वर्षे झाली आहेत. या टर्मिनल्सचा विकास रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या या टर्मिनल्सवर तीन प्लॅटफॉर्म आहेत. या टर्मिनल्समधून सुरुवातीला नांदेड एक्स्प्रेस आणि हैदराबाद एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर नांदेड एक्स्प्रेस पुणे रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात आली. हडपसर टर्मिनल्सच्या विकासासाठी रेल्वे बोर्डाने 135 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यानुसार, रेल्वे प्रशासनाकडून हडपसर टर्मिनल्सचा विकास सुरू आहे. या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसुविधा लक्षात घेऊन कामे सुरू आहेत.
हडपसर टर्मिनल्सकडे जाणारे दोन्ही रस्ते अरुंद आहेत. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. महापालिकेने हे अतिक्रमण दूर करावे. त्यामुळे पीएमपी बस गाड्यांना रस्त्यावरून ये-जा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तसेच वाहतूक कोंडी देखील कमी होईल. यासाठी महापालिकेने योग्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुणे रेल्वे स्थानकाचे काम सुरू झाल्यानंतर अनेक रेल्वे गाड्या हडपसर टर्मिनल्समधून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी बसची संख्या वाढवावी लागणार आहे. मात्र, हडपसर टर्मिनल्सकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याने बस उभी करण्यासाठी पुरेसा जागा नाही. हडपसर टर्मिनसचा विकास होत असताना पीएमपी प्रशासनाने रेल्वे प्रशासनाकडे पाच ते सहा गुंठे जागेची मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे