Hinjewadi Police Station Incident, PSI Assault Dispute: हिंजवडी पोलीस ठाण्यात एका अभूतपूर्व घटनेने खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) केवळ एका जामीन अर्जावरून शिवीगाळ आणि मारहाण केली. इतकेच नव्हे, तर त्याला ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून वर्दी उतरवण्याची धमकीही दिली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) रात्री आठच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मधुकर रतिकांत जगताप (वय ४७, रा. सांगवडे, मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर जगताप एका संशयित आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी अर्ज घेऊन पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी PSI ज्ञानेश्वर झोल हे ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत होते. झोल यांनी जगतापचा अर्ज स्वीकारला. मात्र, त्यानंतर जगतापने संशयित व्यक्ती गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह संदेश टाकत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याला त्वरित समोर बोलावण्याची मागणी केली.
परंतु, ही घटना परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असल्याने PSI झोल यांनी जगतापाला त्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा किंवा अर्ज देण्याचा सल्ला दिला. याच गोष्टीचा राग आल्याने मधुकरने PSI झोल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर त्यांच्याशी झटापट करत त्यांच्या खिशाचे बटणही तोडले.
दरम्यान, इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, मधुकरने त्यांनाही धमकी दिली. ‘तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तुझी वर्दी उतरवतो’, अशी धमकी त्याने पोलिसांना दिली. ‘तू बाहेर भेट, तुला दाखवतो’, अशा शब्दांत त्याने PSI झोल यांना आव्हानही दिले. या गोंधळात मधुकरने PSI ज्ञानेश्वर झोल यांच्या सरकारी कामातही अडथळा निर्माण केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे