कच्छ: आधी ‘कलम ३७०’ आणि आत्ता सुधारित नागरिकत्व कायद्याच्या निमित्ताने बिथरलेल्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू केले आहे. नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाने जलद हल्ला करणाऱ्या तीन युद्धनौका तत्काळ कच्छच्या दिशेने रवाना केल्या आहेत. पश्चिम नौदल कमांडच्या ताफ्यातील ‘आयएनएस विभूती’, ‘आयएनएस विपुल’ व ‘आयएनएस विनाश’, या तीन नौकांचा या तैनातीत समावेश आहे. कॉर्वेट श्रेणीतील या नौका मुंबईच्या पश्चिम कमांड मुख्यालयातून रवाना करण्यात आल्या आहेत. ‘नियंत्रण रेषेवरील स्थिती कुठल्याही क्षणी बिघडू शकते’, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी नुकतेच सांगितले. त्यानंतर नौदलानेही तत्काळ अरबी समुद्रातील गस्त व तैनाती वाढवली आहे. अरबी समुद्रात देखरेखीसाठी नौदलाच्या नौका सातत्याने गस्तीवर असतातच. परंतु, सध्या तणावाची स्थिती असल्याने कॉर्वेट श्रेणीतील तीन नौका तातडीने कच्छच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.
या नौका कमीत कमी वेळेत जलद हल्ला करू शकतात. गरज भासल्यास एखाद्या बंदरावरदेखील हल्ला करण्याची या नौकांची क्षमता असते. त्यामुळेच कच्छच्या पुढे पाकिस्तानच्या समुद्री सीमेवर या नौका तैनात असतील व तेथील हालचालींवर करडी देखरेख करतील. या तिन्ही नौका चार युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे, आठ सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे, हवाई हल्लाविरोधी क्षेपणास्त्र आणि १६ कि.मी.पर्यंत डागता येणाऱ्या तोफेने सज्ज आहेत. या तोफेतील प्रत्येक गोळ्याचे वजन साडेबारा किलो आहे.