Gas Cylinder Price Hike: अच्छे दिन येण्याची स्वप्ने दाखवणाऱ्या सरकारमध्ये महागाईने कहर केला आहे! पेट्रोल-डिझेलच्या किमती कशातरी स्थिर असताना, आता स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरने मध्यमवर्ग आणि गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे. एप्रिल महिन्यापासून सिलिंडरच्या दरात तब्बल ५० रुपयांची वाढ झाली असून, आता तो साडेआठशे ते नऊशे रुपयांच्या घरात पोहोचला आहे. यामुळे महिन्याचे बजेट कसे सांभाळायचे, असा प्रश्न महिलांना सतावत आहे.
इंधनाचे वाढते दर आणि त्यात आता सिलिंडरच्या किमतीतील भर म्हणजे ‘आगीत तेल’ ओतण्यासारखे झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे आधीच फळे, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात आता सिलिंडर महागल्याने सामान्य माणसाच्या ताटातील घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
गेल्या सात-आठ वर्षांत गॅस सिलिंडरच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. कधी ४००-४५० रुपयांना मिळणारा सिलिंडर आज ९०० रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. गृहिणी गीता प्रधान म्हणाल्या, “प्रत्येक महिन्याला कोणत्या ना कोणत्या वस्तूंचे भाव वाढतच असतात. आता सिलिंडर महागल्याने घर चालवणे खूप कठीण झाले आहे.”
महागाईमुळे सामान्य नागरिकांना गरजेच्या वस्तू खरेदी करतानाही विचार करावा लागत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या महिन्याच्या बचतीवर होत आहे. एकीकडे सामान्यांचे हित जपण्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे दरवाढीचा असा ‘चटका’ का दिला जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आता या महागाईच्या भडक्यापुढे सामान्य माणूस कसा टिकाव धरतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे