Sibling Divorce Trend: ज्या नात्यांनी आपल्याला जन्मभर साथ दिली, ज्यांच्यासोबत आपल्या बालपणीच्या आठवणींची सोनेरी पाने जुळलेली आहेत, त्याच नात्यांना आता युवा पिढी ‘गुडबाय’ म्हणतेय! सोशल मीडियावर एका नव्या ‘ब्रेकअप’ ट्रेंडची जोरदार चर्चा आहे – ‘सिबलिंग डिव्होर्स’! वाचून धक्का बसला ना? पण हे खरं आहे! नवरा-बायकोच्या नात्याप्रमाणेच आता भाऊ-बहिणही मानसिक आणि भावनिक दृष्ट्या स्वतःला वेगळं करत आहेत. ही ‘नातं तोडो’ क्रांती थेट रक्ताच्या नात्यांपर्यंत पोहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे!
इन्स्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबच्या जगात या ‘सिबलिंग डिव्होर्स’ची हवा चांगलीच तापली आहे. पुणे, मुंबई, बेंगळुरू आणि दिल्लीसारख्या मेट्रो शहरांमधील कॉलेजमधील तरुण-तरुणींमध्ये याची जोरदार चर्चा आहे. या ‘डेअरिंग’ निर्णयामागे दडलंय स्वतःच्या मानसिक शांततेचं आणि आत्मसन्मानाचं अभेद्य कवच! सततची भांडणं, तुलना, टोमणे आणि कुटुंबातील नकारात्मक वातावरणामुळे पिचलेल्या या पिढीने आता ‘सहन करण्याची’ भूमिका सोडली आहे. ते ‘नातं तोडणं’ या शब्दाऐवजी ‘आपल्याभोवती लक्ष्मणरेषा आखणं’ अधिक योग्य मानतात.
या ‘ब्रेकअप’मुळे मानसिक तणावाच्या गर्तेतून सुटका मिळालेले तरुण आता अधिक स्थिर आणि शांत आयुष्य जगू शकत आहेत. पण या बदलाची दुसरी बाजू तितकीच वेदनादायी आहे. लहानपणाच्या गप्पा, एकत्र खेळलेले खेळ आणि कुटुंबातील प्रेमळ बंध हळूहळू भूतकाळात जमा होऊ लागतात. पिढ्यानपिढ्या जपलेल्या नात्यांची ही नवी व्याख्या खरंच धक्कादायक आहे!
आजची युवा पिढी ‘माझं मन, माझी शांती’ या मंत्रावर जगतेय. रक्ताच्या नात्यांपेक्षा स्वतःच्या समाधानाला सर्वाधिक महत्त्व देणारी ही पिढी आता नात्यांची नवी परिभाषा लिहित आहे. हा बदल अनेकांना कोड्यात टाकणारा असला तरी, ‘पहिला हक्क स्वतःच्या आनंदाचा’ हा विचार आता जोर धरू लागला आहे. आता बघूया, भावना आणि परंपरेच्या धाग्यांनी बांधलेली आपली संस्कृती या ‘सिबलिंग डिव्होर्स’च्या वादळाला कशा प्रकारे सामोरी जाते आणि या नात्यांच्या भविष्याची दिशा काय ठरवते? हे नक्कीच पाहण्यासारखं असेल!
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे