पोलिसांच्या वारसांनाही मिळणार अर्थसहाय्य

मुंबई : अहोरात्र कर्तव्य बजावून जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणारे तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कष्ट घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पोलीस सेवेत कार्यरत असणाऱ्या पोलीस अंमलदारांना नैसर्गिक मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना ५० हजारांची मदत दिली जाणार आहे.अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे

पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदार या दर्जापर्यतच्या अंमलदारांच्या वारसांना ही मदत दिली जाणार आहे. दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या निधी, मदती व्यतिरिक्त ही रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे. पोलीस महासंचालक विशेष सहाय्यता निधीतून हे अनुदान तातडीने दिले जाणार आहे. हा लाभ वारसाला मिळण्यासाठी संबंधित पोलिसांचे मृत्यूचे प्रमाणपत्र, त्यांच्या कायदेशीर वारसदारांच्या नोंदीबाबतचा अभिलेख, घटक प्रमुखांच्या बॅँक खातेबाबतचा सविस्तर तपशील, त्यासाठीची शिफारस तातडीने पोलीस प्रमुखांनी महासंचालक कार्यालयात पाठवावयाची आहे.

दिलासादायक निर्णय कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागल्यास त्यांच्या कुटुंबियांना मदतीची तरतूद होती ती आहे तशीच राहणार आहे. मात्र आता नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यास देखील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना अर्थसहाय्य मिळणार असल्याने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे.

याबाबत पोलीस महासंचालक म्हणाले की, नैसर्गिकरित्या निधन पावणाऱ्यांच्या वारसांना निर्धारित स्वरुपाशिवाय अन्य लाभ मिळत नव्हता. मात्र आता त्यांच्यासाठी 50 हजार रुपये अनुदान दिल्याने बिकट प्रसंगी त्यांना दिलासा मिळण्यास मदत होईल.
दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयसवाल यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना दिले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा