बाणेर पोलीस ठाण्यात खळबळ! वरिष्ठ निरीक्षकांसह तिघांची बदली, व्हायरल फोटो ठरला कारण!

Baner Police Station Transfer News
बाणेर पोलीस ठाण्यात खळबळ;

Baner Police Station Transfer News: पुणे शहरात बाणेर पोलीस ठाण्यात अचानक मोठे फेरबदल झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जाधव यांच्यासह सहायक निरीक्षक ऋतुजा जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक आर. आर. पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे पोलीस वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांची बाणेरच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

या बदल्यांमागे एक खास कारण आहे. काही दिवसांपूर्वी बाणेर पोलीस ठाण्यात फर्निचर नूतनीकरणाचे काम सुरू होते. याच दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीत बसून फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. हे छायाचित्र वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच खळबळ माजली. पोलीस आयुक्तांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी केली.

या चौकशीनंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जाधव यांची कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तर, सहायक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना खडक पोलीस ठाण्यात आणि पोलीस उपनिरीक्षक आर. आर. पाटील यांना न्यायालयीन बंदोबस्त (कोर्ट कंपनी) विभागात पाठवण्यात आले आहे.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मागील दीड वर्षांपासून उत्कृष्ट काम करणारे चंद्रशेखर सावंत आता बाणेर पोलीस ठाण्याची धुरा सांभाळणार आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपाखाली या दोन महिला अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, या बदल्या केवळ प्रशासकीय नसून त्यामागे व्हायरल झालेल्या छायाचित्राचे आणि त्या अनुषंगाने झालेल्या चौकशीचे मोठे कारण आहे, हे स्पष्ट झाले आहे. बाणेर पोलीस ठाण्यातील या फेरबदलांमुळे आता पोलीस दलात काय नवीन बदल घडतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे