Ankush Paute wins Shiv Chhatrapati Award: पिंपरी-चिंचवड शहरासाठी आजचा दिवस अत्यंत गौरवाचा ठरला आहे! येथील वॉटर पोर्ट सेंटरच्या आठ जिगरबाज खेळाडूंनी राष्ट्रीय कयाकिंग आणि कॅनोइंग क्रीडा स्पर्धेत आपली जागा निश्चित केली आहे. या बातमीने क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर, पिंपरी-चिंचवड वॉटर स्पोर्ट्सचा हिरा, अंकुश पौटे याला महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा खाशाबा जाधव पुरस्कार युवा खेळाडू सौरव नांगरे यांच्या नावावर कोरला गेला आहे.
पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्टस सेंटरचे अध्यक्ष सिद्धेश्वर बारणे आणि सचिव दत्तात्रय बारणे यांनी या दोन्ही मोठ्या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या खेळाडूंना कठोर प्रशिक्षण देणारे निखिल बारणे, स्वामी महात्मे आणि महेश थिटे यांच्या मार्गदर्शनाची त्यांनी प्रशंसा केली.
भोपाळ येथे होणाऱ्या सबज्युनिअर व ज्युनिअर कॅनो स्प्रिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पिंपरी-चिंचवड वॉटर स्पोर्ट्सचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आठ तरुण खेळाडू सज्ज झाले आहेत. या संघात निरंजन पाटील, सुयोग भगुरे, जगदीश कलाने, द्वित रणपिसे, हर्षवर्धन राठोड, वीर कांबळे, कश्वी रणपिसे आणि विराज वागसकर यांचा समावेश आहे. या युवा खेळाडूंनी आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने हे यश संपादन केले आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंकुश पौटे यांना नुकताच शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. अंकुशची क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि समर्पण भाव यामुळे त्याला हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.
या दोन्ही महत्त्वपूर्ण घडामोडींमुळे शहर परिसरात आनंदाची आणि अभिमानाची लाट पसरली आहे. खेळाडूंच्या या दैदीप्यमान यशाबद्दल विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने त्यांचे अभिनंदन आणि सत्कार समारंभ आयोजित केले जात आहेत. पिंपरी-चिंचवडच्या या जलवीरांनी राष्ट्रीय स्तरावरही आपल्या शहराचे नाव रोशन करावे, यासाठी सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत!
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे