Munjoba Maharaj Yatra 2025: पिंपळे सौदागर येथील ग्रामदैवत मुंजोबा महाराज यांच्या वार्षिक यात्रोत्सवाला काल (मंगळवारी, दि. २९) प्रचंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. पिंपळे सौदागरमधील नागरिकांनी राजकीय गट-तट आणि विचारसरणी बाजूला सारून एकोप्याने आपल्या लाडक्या ग्रामदेवतेचा उत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. या एकजुटीच्या भूमिकेमुळे सर्व स्तरातील नेतेमंडळी आणि ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
मुंजोबा महाराज यात्रा उत्सव समितीने यावर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रमांची भव्य मालिका आयोजित केली आहे. यासोबतच, कुस्ती शौकिनांसाठी भव्य आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे उत्सवाला एक वेगळीच रंगत येणार आहे. गावाला उत्सवाचे रूप आले असून, ठिकठिकाणी आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत, ज्यामुळे वातावरण अधिक उत्साही आणि प्रसन्न झाले आहे.या मंगलमय सोहळ्यात उत्सव समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांनी ग्रामदेवतेच्या आणि इतर मंदिरांतील मूर्तींना भक्तिभावाने पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.
मुंजोबा महाराजांची यात्रा म्हणजे केवळ एक उत्सव नसून, पिंपळे सौदागरमधील प्रत्येकासाठी एक आनंदाची पर्वणी असते. या निमित्ताने दूर असलेले आप्तेष्ट आणि नातेवाईक एकत्र येतात. विशेषतः विवाहानंतर दुसऱ्या गावी गेलेल्या मुली आपल्या माहेरी परत येतात, ज्यामुळे आनंदाला आणि उत्साहाला अधिक उधाण येते.उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष काटे, पालखी समितीचे अध्यक्ष गणेश काटे, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कुंजीर आणि आखाडा समितीचे अध्यक्ष राजू मुरकुटे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्याने या उत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे, जे कौतुकास्पद आहे.
आज (बुधवारी, दि. ३०) पिंपळे सौदागरच्या गावजत्रा मैदानावर सायंकाळी कुस्त्यांचा भव्य आखाडा रंगणार आहे. यासाठी लाल मातीचा आखाडा तयार करण्यात आला असून, पैलवानांसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. कुस्ती शौकिनांसाठी बैठक व्यवस्थाही चोख करण्यात आली आहे, त्यामुळे कुस्त्यांचा थरार अनुभवण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.यात्रेच्या मुख्य दिवशी, काल सकाळी मुंजोबा महाराजांच्या मूर्तीला पारंपरिक पद्धतीने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आकर्षक पोशाख आणि फुलांच्या माळा अर्पण करून ‘मुंजोबा महाराज की जय’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमला. या भक्तिमय वातावरणात पिंपळे सौदागर पूर्णपणे तल्लीन झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे