Using nuclear bombs is not easy, India warns Pakistan: पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अत्यंत गंभीर पातळीवर पोहोचला आहे. सीमारेषेवर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्कर सतर्क स्थितीत असून, पाकिस्तानकडून सातत्याने उर्मट आणि पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. विशेषतः अणूबॉम्ब वापरण्याच्या त्यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा या देशाची नाटकी भूमिका उघड झाली आहे. पाकिस्तानमधील नेते आणि लष्करी अधिकारी आजवर जे रशियासारख्या बलाढ्य देशाला जमलं नाही, ते आम्ही करू अशी उधळण करत आहेत. पण, हा दावा कितपत वास्तववादी आहे?
रशिया हा आज जगातील सर्वात मोठ्या अणुशक्तींपैकी एक आहे. अमेरिकेला थेट भिडण्याची ताकद फक्त रशियाकडेच आहे, असे जग मान्य करतं. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिका आणि रशियामधील स्पर्धेला सुरुवात झाली आणि शीतयुद्धाच्या कालखंडात ही चढाओढ शिगेला पोहोचली. आजही अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर हे दोन देश समोरासमोर आहेत. दोघांनीही इतिहासात अनेक युद्धं लढली आहेत. अमेरिका अनेक वर्ष अफगाणिस्तानात अडकलेली होती, तर रशिया सध्या युक्रेनविरोधात युद्ध लढत आहे. हे युद्ध सुरू होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे, पण अद्याप रशियाने अणूबॉम्ब वापरलेला नाही.
हेच वास्तव पाकिस्तानने समजून घेण्याची गरज आहे. रशियासारखा देशसुद्धा इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर अणवस्त्रांचा वापर करत नसेल, तर पाकिस्तानसारख्या देशाने वारंवार अणूबॉम्बच्या धमक्या देणं ही केवळ आत्मप्रौढी आहे. अणूबॉम्ब वापरणं इतकं सोपं नाही. हिरोशिमा आणि नागासाकीच्या हल्ल्यांनी अणू युद्धाचे परिणाम किती विध्वंसक असतात, हे संपूर्ण जगाने पाहिलं आहे. त्यामुळे कोणताही जबाबदार देश ही पायरी शेवटच्या टप्प्यावरच उचलतो.
पाकिस्तानकडे अणवस्त्रं असणं हे नक्कीच चिंतेचं कारण आहे, पण त्याचा वापर करणे ही वेगळी गोष्ट आहे. अणवस्त्रं निर्माण केली जातात, शत्रुला रोखण्यासाठी, युद्ध भडकवण्यासाठी नव्हे. पण पाकिस्तानची धोरणं याच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. एकीकडे दहशतवादी हल्ले घडवायचे आणि दुसरीकडे भारताला अणूबॉम्बने धमकवायचं ही नीती किती काळ टिकेल? भारताने 2016 मधील सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 मधील एअर स्ट्राइकद्वारे आधीच स्पष्ट केलं आहे की, तो शांततेच्या मार्गाने चालतो, पण गरज पडल्यास ठोस प्रत्युत्तर देण्यातही मागे हटत नाही.
त्या वेळीसुद्धा पाकिस्तानकडे अणूबॉम्ब होते, पण त्यांनी ते वापरले नाहीत. कारण त्यांनाही ठाऊक आहे की, भारताचे प्रत्युत्तर अधिक भयानक असेल. त्यामुळे अणूबॉम्बच्या धमक्यांना भारत घाबरत नाही आणि घाबरणारही नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्याची गरज आहे.आज पाकिस्तान जे करत आहे, ते एका जबाबदार देशाला शोभणारे नाही. अशा प्रकारच्या उथळ धमक्यांनी युद्ध थांबत नाहीत, उलट त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात. त्यामुळे भारताने संयम बाळगून, परंतु ठामपणे पाकिस्तानला हे स्पष्ट करणं आवश्यक आहे की, अणूबॉम्बच्या धमक्यांनी भारत घाबरणार नाही. भारत शांतता पसंत करतो, पण जर त्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला, तर तो ‘जशास तसे’ उत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही. हाच स्पष्ट आणि ठाम संदेश पाकिस्तानला देण्याची वेळ आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, राजश्री भोसले