Kamshet Government Land Survey Dispute: कामशेत शहरात मंगळवारी शासकीय जागेच्या मोजणीवरून मोठा गदारोळ झाला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी मोजणीसाठी आले असता, संतप्त २०० हून अधिक व्यापारी आणि ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला. अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत या मोजणीला तीव्र विरोध दर्शविला, ज्यामुळे अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय जागेच्या मोजणीसाठी नोटीस काढली होती. मात्र, अनेक व्यापारी आणि ग्रामस्थांना ही नोटीस वेळेवर मिळाली नसल्याचा आरोप आहे. ठरलेल्या दिवशी, बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता आकाश पोळ आणि भूमी अभिलेख विभागाचे भू-करमापक के. बी. महादुले आपल्या कर्मचाऱ्यांसह मोजणीसाठी दाखल झाले. मात्र, या वेळी संतप्त जमावाने त्यांना घेरले आणि मोजणीच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह उभे केले.
अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार;


व्यापारी आणि ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा वर्षाव करत त्यांना चांगलेच धारेवर धरले. “विश्वासात घ्या, चर्चा करा, मगच नोटीस द्या,” अशी स्पष्ट भूमिका आंदोलकांनी घेतली. ज्येष्ठ नागरिक माउली शिंदे आणि किरण ओसवाल यांनी सांगितले की, सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून आणि प्रत्येकाला नोटीस देऊनच मोजणी करावी.
बांधकाम खात्याशी संबंध नसलेल्या गट सर्व्हे नंबरधारकांना नोटीस का दिली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे, बांधकाम विभागाने या मोजणीबाबत शहर पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी कोणताही पोलीस बंदोबस्त तैनात नव्हता. अखेरीस, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला आणि आपले कार्यालय गाठले. त्यामुळे शासकीय जागेची ही मोजणी होऊ शकली नाही.
या गोंधळाबाबत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास भटेवरा म्हणाले की, कोणालाही नोटीस न देता आणि जागेसंबंधी कोणताही खुलासा न करता अधिकारी आले होते. आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास ते असमर्थ ठरल्याने व्यापारी आणि ग्रामस्थांनी विरोध केला. तर, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तानाजी दाभाडे यांनी सांगितले की, रस्त्याच्या कामाशी संबंध नसलेल्या शेतजमीन धारकांनाही बांधकाम विभागाने नोटीस पाठवल्या होत्या.
बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता आकाश पोळ यांनी सांगितले की, रस्त्याच्या बाजूचे गट आणि लगतची जागा मोजणीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, हरकतीमुळे मोजणी थांबवण्यात आली आहे. दुसरीकडे, कामशेत पोलीस ठाण्याचे हवालदार गणेश तावरे यांनी सांगितले की, शासकीय मोजणीबाबत त्यांना कोणतेही लेखी पत्र प्राप्त झाले नव्हते, त्यामुळे पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हते. या संपूर्ण घटनेवरून शासकीय यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे