शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमावलीत होणार महत्त्वपूर्ण बदल;परिवहनमंत्र्यांची ग्वाही

11
New school bus safety rules Maharashtra
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमावलीत होणार बदल

New school bus safety rules Maharashtra: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, विद्यार्थ्यांच्या स्कूल बस प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल आणि त्यासाठी आवश्यक नियमावलीत लवकरच महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात येतील. गुरुवारी (दि. ८) यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित स्कूल बस असोसिएशन आणि पालक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक यांनी यावेळी स्कूल बस चालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावनांचा आणि अडचणींचा सहानुभूतीने विचार केला जाईल, मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नियमांचे पालन केवळ कायद्याच्या धास्तीमुळे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या भावनेतून व्हायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले की, स्कूल बस धोरण लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. आता या धोरणातील त्रुटी दूर करून ते अधिक प्रभावी बनवले जाईल.

राज्यात सुमारे ६० हजार अनधिकृत स्कूल बसेस धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याच्या तक्रारींची दखल विभागाने घेतली आहे. अशा अनधिकृत चालकांनी आणि मालकांनी तातडीने आरटीओमध्ये दंड भरून आपल्या बसेस अधिकृत करून घ्याव्यात, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन विभागाने दिला आहे.परिवहन मंत्र्यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता सुधारित नियमांमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे