वाल्हेकरवाडीत थरार,दुचाकीस्वारांचा १७ वर्षीय कोमलवर जीवघेणा हल्ला, उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली.

47
वाल्हेकरवाडीत थरार! दुचाकीस्वारांचा १७ वर्षीय कोमलवर जीवघेणा हल्ला
वाल्हेकरवाडीत थरार! दुचाकीस्वारांचा १७ वर्षीय कोमलवर जीवघेणा हल्ला

Thrilling incident in Walhekarwadi:वाल्हेकरवाडी येथील कृष्णाई कॉलनीत रविवारी रात्री एका हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली. दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी १७ वर्षीय युवती कोमल भारत जाधव हिच्यावर चाकूने वार करत तिची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोमलचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

रात्री नऊच्या सुमारास कोमलवर अचानक हल्ला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री नऊच्या सुमारास कृष्णाई कॉलनी परिसरात कोमलवर अचानक हल्ला झाला. हल्लेखोरांनी तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी धारदार शस्त्राने वार केले आणि तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच कोमलची चुलत बहीण आदितीने तातडीने तिच्या मामांना म्हणजेच फिर्यादी सचिन बिभीषण माने यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

मामा सचिन माने यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि कोमलला तातडीने आपल्या वाहनातून एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच कोमलची प्राणज्योत मालवली.

या दुर्दैवी घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. फिर्यादी सचिन माने यांच्या तक्रारीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कसून तपास करत काही तासांतच उदयभान बंसी यादव (वय ४२) आणि अभिषेक रणविजय यादव (वय २१, मूळ रा. आंबेडकरनगर, उत्तर प्रदेश या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही वाल्हेकरवाडी परिसरातच राहणारे आहेत.

हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू केली असून, या घटनेमागील सत्य लवकरच उघडकीस येईल, अशी अपेक्षा आहे. मृत कोमल तिच्या आई आणि भावासोबत कृष्णाई कॉलनी येथे राहत होती. तिच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे