धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप; भाजप मंत्र्याविरोधात गुन्हा

35
vijay shah supreme court plea
कर्नल सोफिया कुरेशी "दहशतवाद्यांची बहीण"

Vijay Shah controversy over Muslim officer:भाजपचे मंत्री कुँवर विजय शाह यांनी एक वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी सैन्यातील महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल असं विधान केलं की ती “दहशतवाद्यांची बहीण” आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या लेफ्टनंट कर्नलवर भाजप मंत्र्याची टीका; निषेधाची लाट

कर्नल सोफिया कुरेशी या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय हवाई दलाच्या पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरील कारवाईची माहिती माध्यमांना देणाऱ्या महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक होत्या. मात्र विजय शाह यांनी सार्वजनिकरित्या म्हटले की, “ज्यांनी आपल्या मुलींचं सिंदूर पुसलं होत, त्यांच्यावर बदला घेण्यासाठी आपण त्यांच्या बहिणीला पाठवलं.” या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय.

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने या विधानाची गंभीर दखल घेत ती भाषा “अपमानास्पद”, “धोकादायक” व “गटारगट” असल्याचे म्हटले. न्यायालयाने स्पष्ट केले की, हे वक्तव्य केवळ संबंधित सैन्य अधिकाऱ्यावरच नव्हे, तर संपूर्ण सशस्त्र दलांवर टिका करणारे आहे. तसेच न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, कोणत्याही व्यक्तीने देशासाठी निःस्वार्थ सेवा केली तरी केवळ ती मुस्लिम असल्यामुळे तिची अशी थट्टा होणे ही गंभीर गोष्ट आहे.

या पार्श्वभूमीवर न्यायालयाने मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) यांना तातडीने विजय शाह यांच्याविरुद्ध FIR नोंदवण्याचे आदेश दिले. तसे न केल्यास अवमान न्यायालयाची (Contempt of Court) कारवाई होईल, असा इशाराही दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर काही तासांतच शाह यांच्यावर भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत कलम 152, 196(1)(b), आणि 197(1)(c) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

काय सांगत आहेत हे कलम पाहुयात,

कलम १५२ भारतीय न्याय संहिता कोणतीही व्यक्ती जर कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या सार्वजनिक सेवकाच्या आदेशाचे उल्लंघन करत दंगल किंवा हिंसाचार करते, तर तिच्यावर ही कलम लागू होते.

कलम १९६ (१) b भारतीय न्याय संहिता
जर एखादी व्यक्ती सरकारविरुद्ध द्वेष, वैरभाव किंवा असंतोष पसरवणारे शब्द, लेखन, खुणा, किंवा चित्र सार्वजनिकपणे व्यक्त करते, प्रसिद्ध करते किंवा प्रसारित करते, तर तिच्यावर हे कलम लागू होऊ शकते.

कलम १९७ (१) c भारतीय न्याय संहिता
कोणतीही व्यक्ती जर जाणूनबुजून अशा प्रकारचे वक्तव्य, लेखन, चित्र, इशारा, किंवा कृत्य करते जे एखाद्या विशिष्ट वर्ग, धर्म, जात, भाषा, प्रदेश किंवा समुदायाविरुद्ध वैरभाव, द्वेष, किंवा शत्रुत्व निर्माण करतात, तर त्यांच्यावर हे कलम लागू होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – राजश्री भोसले