पुण्यात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र: मोकळा श्वास घेणारे रस्ते, व्यावसायिकांना दणका!

17
Roads and sidewalks
अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा

अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा

Roads and sidewalks:पुणे शहरातील रस्ते आणि पदपथ आता अधिक मोकळा श्वास घेणार आहेत! महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कडक इशाऱ्यानंतर अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागांतील अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू केली आहे. गोखले रस्ता (फर्ग्यूसन), दीप बंगला चौक, तुळशीबाग आणि नरपतगिरी चौक यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे हटवण्यात आली असून, काही व्यावसायिकांना दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील रस्ते भाजीपाला विक्रेते, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि विविध व्यावसायिक वस्तूंनी व्यापले होते. यामुळे पादचाऱ्यांसाठी चालणेही मुश्किल झाले होते. यावर प्रभावी कारवाई व्हावी यासाठी अतिक्रमण विभागांच्या प्रमुखांसह अतिक्रमण निरीक्षकांच्या बदल्याही करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही परिस्थिती सुधारत नव्हती. काही ठिकाणी तर महापालिकेच्या गाड्यांशेजारीच व्यवसाय थाटले जात असल्याचे चित्र दिसत होते, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती.

याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांना अतिक्रमनविरोधी कारवाई तीव्र करण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर, अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. या आदेशानंतर अतिक्रमण विभागाने आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे.

या कारवाईमुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक आता मोकळे झाले आहेत, ज्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांची वर्दळ अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पुणेकरांना आता मोकळ्या आणि स्वच्छ रस्त्यांचा अनुभव घेता येणार आहे. ही मोहीम अशीच सुरू राहिल्यास शहर अधिक सुंदर आणि सुव्यवस्थित होईल अशी अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे