Chikhali DP Land Reservation Controversy2025: तीन महिन्यांपूर्वी बुलडोझरच्या कारवाईने चिखली आणि कुदळवाडीतील नागरिकांच्या डोळ्यातील पाणी अजून पूर्णपणे सुकलेले नाही, तोच आता विकास आराखडा (DP) त्यांच्या जमिनींवर ‘वरवंटा’ फिरवण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल १७५ एकर क्षेत्रावर, म्हणजेच ७ लाख १० हजार ९०० चौरस मीटर परिघात, प्रशासकीय व व्यापार संकुलाचे (Super Administrative cum Commercial Complex) मोठे आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे येथील स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे.
आगीतून फुफाट्यात टीपीनंतर आता ‘डीपी’चा दुष्टचक्र
कुदळवाडी आणि चिखलीतील नागरिकांचे दुर्दैव काही केल्या पाठ सोडायला तयार नाही. आधी अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला गेला, त्यानंतर टीपी (टाऊन प्लॅनिंग) योजना लादण्याचा प्रयत्न झाला. कडव्या विरोधामुळे टीपी योजना गुंडाळावी लागली असली तरी, आता ‘डीपी’च्या रूपाने नवीन संकट उभे राहिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९६ मध्ये समाविष्ट झालेल्या या भागातील रस्ते, उद्याने, शाळा यांसारखी साठ टक्के आरक्षणे अजूनही विकसित झालेली नाहीत. त्यातच आता हे नवीन आरक्षण प्रस्तावित झाल्याने येथील भूमिपुत्रांना भूमिहीन होण्याची भीती वाटत आहे.
जाधववाडीसह १७५ एकर क्षेत्रावर प्रशासकीय व व्यापार संकुलाचे महाआरक्षण
१६ मे रोजी जाहीर झालेल्या नवीन शहर विकास आराखड्यात चिखली गावठाण सोडून आळंदी रस्त्यावर, कुदळवाडीच्या दोन्ही बाजूने, जाधववाडी, रोकडे वस्ती आणि अगदी रिव्हर रेसिडन्सीपर्यंतच्या १७५ एकर क्षेत्रावर हे महाआरक्षण टाकण्यात आले आहे. याशिवाय, प्रशासकीय व व्यापार संकुल आणि औद्योगिक आरक्षणेही प्रस्तावित आहेत.
स्थानिक शेतकरी जितेंद्र यादव यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “कुदळवाडीत काही महिन्यांपूर्वी अन्यायकारक कारवाई केली, त्यानंतर टीपी आणि आता डीपी टाकला आहे. आराखड्यात चिखली, जाधववाडीतील सर्व जमीन महाआरक्षणात आल्याने भूमिपुत्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवीन आराखड्यासंदर्भात ग्रामस्थ विरोध नोंदवणार आहेत.”
उद्योजक विशाल यादव यांनीही या आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. “जुन्याच डीपीतील आरक्षणे विकसित करता आलेली नाहीत, त्यात आता हे मोठे आरक्षण टाकून आम्हाला भूमिहीन करण्याचा डाव आहे. यापूर्वी टेल्को, रेड झोन, एमआयडीसी, प्राधिकरणात जमिनी गेल्या. अनेक ठिकाणी बाधित झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा या आरक्षणाला विरोध आहे. गाव जी भूमिका घेईल, ती मान्य असेल,” असे ते म्हणाले.
या नवीन आरक्षणाने चिखली आणि कुदळवाडीच्या विकासाचे चित्र काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे