Pimpri Chinchwad Cyber Crime Arrest: पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करत चार संशयितांना अटक केली आहे. या कारवाईसाठी पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत धाराशिव, लातूर आणि जयपूर (राजस्थान) असा तब्बल ४००० किलोमीटरचा प्रवास केला. बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे ७१ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावला आहे.
गुंतवणुकीचे आमिष, ७१ लाखांची फसवणूक
फिर्यादींना ‘एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज’ या नावाने एका बनावट ॲपद्वारे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून फिर्यादींनी एकूण ७१ लाख रुपये गुंतवले. या प्रकरणी रितु व्होरा, हरीश सिंग, अजय गर्ग आणि इतर साथीदारांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कशी झाली कारवाई?
गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांना एका बँक खात्यावर ५० लाखांचे व्यवहार झाल्याचे आढळून आले. हे खाते धाराशिव येथील अलफहाद आरिफ मोमीन (वय २७) याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हे खाते अजय ऊर्फ शिवप्रसाद मलिकार्जुन खुदासे (३९, रा. लातूर) याच्या सांगण्यावरून उघडल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तात्काळ लातूर येथून
खुदासेला अटक केली.
पुढील तपासात खुदासेने हे खाते सूर्या ऊर्फ राहुलसिंग कर्णावत (रा. झुंझुनू, राजस्थान) याला दिल्याचे उघड झाले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने जयपूर येथे सापळा रचून राहुलसिंगला अटक केली. राहुलसिंगने प्रेमशंकर बलदेव बैरागी (रा. भिलवाडा, राजस्थान) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी जयपूरमधून प्रेमशंकरलाही बेड्या ठोकल्या.
आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि ३.२५ कोटींचे व्यवहार
या टोळीचे चीन, कंबोडिया आणि दुबईतील व्यक्तींशी ‘कनेक्शन’ असल्याचेही तपासात समोर आले आहे. संशयित सूर्या आणि प्रेमशंकर या आंतरराष्ट्रीय संपर्कात होते आणि त्यांच्या बँक खात्यांवर अवघ्या दोन दिवसांत ३.२५ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही निष्पन्न झाले आहे.पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे