Heavy Rain for PCMC : मान्सूनपूर्व धुवाधार पावसाने सोमवारी पिंपरी-चिंचवड शहराला अक्षरशः झोडपून काढले. अवघ्या एका तासाच्या मुसळधार सरींमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. नालेसफाईचे महापालिकेचे दावे पूर्णपणे फोल ठरले असून, सखल भागांत पाणी साचले, तर अनेक घरांमध्ये, विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये, ड्रेनेजचे दूषित पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. यामुळे महापालिकेच्या आपत्कालीन तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने अल्पावधीतच शहरातील मुख्य रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत होते. चिखली येथील घरकुल परिसर, ताथवडे आणि रावेत येथील भोंडवे कॉर्नर येथे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालकांची दाणादाण उडाली. दापोडी, सांगवी, आकुर्डी, भोसरी, चिखली, निगडी-प्राधिकरणासह अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पिंपरीतील झोपडपट्ट्यांमध्ये तर ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने दुर्गंधी पसरली आणि संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.
नालेसफाई पूर्ण न झाल्याने कचरा तुंबला, स्मार्ट सिटीचे रस्ते बनवताना चेंबरची उंची जास्त झाल्याने आणि रस्त्यांपेक्षा फुटपाथची उंची जास्त झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला. भुयारी मार्गात पाणी वाहून नेण्यासाठी नाले नसल्यानेही रस्त्यांवर पाणी साचले होते.शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होण्यापूर्वीच पाऊस आल्याने आणि नाल्यांमध्ये माती व प्लास्टिक गेल्याने ते तुंबले.
नागरिक प्रीतम मुळे आणि अभिजित जाधव यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही घरात पाणी शिरले असून, महापालिकेकडे तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. ड्रेनेजच्या पाण्यामुळे दुर्गंधी वाढून लहान मुले आजारी पडल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. पावसाचा जोर वाढताच रस्त्यांवरील फळे, भाजी विक्रेते, पथारीवाल्यांनीही आपला गाशा गुंडाळला. आकुर्डी, निगडी-प्राधिकरणात शेकडो घरात पाणी शिरले असून, मोशी, विठ्ठलवाडी, परमार पार्क, निगडी चौकातही पाण्याची समस्या निर्माण झाली होती.
या स्थितीवरून महापालिकेची पावसाळापूर्व तयारी अपुरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने होणारे नुकसान आणि आरोग्याचे प्रश्न लक्षात घेता, भविष्यात महापालिकेने अधिक गांभीर्याने गटार आणि नालेसफाईची कामे हाती घेणे गरजेचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे