मुंबई: २४ तारखेला म्हणजेच आज मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी चर्चा चालू होती. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे पहिले सहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले असून, आता सारे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारची कामे वेगाने सुरू होतील. मात्र, कॉंग्रेसची यादी अंतिम झाली नसल्याने हा मुहूर्त टळल्याची माहिती आहे. आता हा विस्तार शुक्रवारपर्यंत ता. २७ डिसेंबर पर्यंत लांबणीवर पडणार, असे सांगण्यात येत आहे.
हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्ताराचा विचार केला जाऊ शकतो असे चर्चा सर्वत्र चालू होती. सरकार स्थापन झाल्यापासून बरेच दिवस मंत्रिमंडळ विस्ताराचे कार्य निलंबनावर पडले होते. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर ठाकरे सरकारच्या कामांना वेग मिळेल अशी शक्यता आहे. एक तर आधीच सत्ता स्थापनेत बराच विलंब झाला होता आणि त्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार काही कारणाने खोळंबल्या मुळे बरीचशी कामे संथ गतीने चालू आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार असल्याचे सांगितले जाते. मात्र, कॉंग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी प्रचंड लॉबिंग सुरू असल्याने हायकमांडदेखील हवालदिल झाल्याची चर्चा आहे. जोपर्यंत कॉंग्रेसचे “ग्रहण’ सुटत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार रेंगाळण्याची शक्यता आहे. कदाचित आज ही यादी अंतिम होऊ शकते. मात्र, त्यानंतर २५ व २६ ला मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमासाठी मुंबईबाहेर आहेत. त्यातच २६ ला सूर्यग्रहण व अमावास्या असल्याने विस्तार नको, अशी काही नेत्यांची मागणी असल्याची माहितीही समोर येत आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तार २७ डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.