‘शि. द. १००’ महोत्सव पुण्यात रविवारपासून तीन दिवस हास्याची बरसात!

Shi. Da. 100 Festival in Pune Free Cartoon Exhibition & Events
शिवराम दत्तात्रय फडणीस

Shi. Da. 100 Festival in Pune Free Cartoon Exhibition & Events: ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रय फडणीस ऊर्फ ‘शि. द. फडणीस’ यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात २७ ते २९ जुलै या कालावधीत ‘शि. द. १००’ हा भव्य महोत्सव रंगणार आहे! बालगंधर्व रंगमंदिरात नुकतेच या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी राजकुमार चोरडिया, कृष्णकुमार गोयल, वीरेंद्र चित्राव आणि चारुहास पंडित उपस्थित होते.

S. D. Phadnis Cartoon Exhibition Shi. Da. 100 Festival

या हास्याच्या सोहळ्याची सुरुवात रविवारी, २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बालगंधर्व कलादालनात होणार आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या हस्ते व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यात शि. द. यांची गाजलेली व्यंगचित्रे तसेच राज्यभरातील कलाकारांनी त्यांना अर्पण केलेली खास चित्रे पाहता येतील. याच दिवशी दुपारी ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांचा ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ हा दृक-श्राव्य कार्यक्रम सादर होईल.

सोमवारी ‘शि. द. : कला आणि कल्पना’ या परिसंवादात लेखिका मंगला गोडबोले, प्रा. मिलिंद जोशी, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी आणि लेखक सतीश पाकणीकर हे चारुहास पंडित यांच्याशी संवाद साधणार आहेत. मंगळवारी ‘शब्दांवाचून…’ या विशेष सादरीकरणात विवेक प्रभुकेळुस्कर देश-विदेशांतील शब्दविरहित व्यंगचित्रकलेचे रसग्रहण करतील.

S. D. Phadnis Cartoon Exhibition

दररोज दुपारी ४ वाजता योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, शुभम जिंदे, उमेश कवळे हे कलाकार डिजिटल व्यंगचित्र प्रात्यक्षिके आणि अर्कचित्र सादरीकरण करतील. महोत्सवाचा समारोप मंगळवारी, २९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‘हसरी सेंच्युरी’ या नागरी मानवंदना कार्यक्रमाद्वारे होईल. यावेळी शि. दं. फडणीस यांचा नागरी सत्कार होणार असून, डॉ. गो. बं. देगलूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. हा संपूर्ण महोत्सव सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे