“Danger for Puneites’ Health! 1,500 Suffer Food Poisoning from Dirty Food, FDA Not Acting”
पुणे शहरात दूषित अन्न आणि अस्वच्छतेमुळे अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या सहा महिन्यांत (फेब्रुवारी ते जुलै) पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये तब्बल दीड हजारांहून अधिक रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि रस्त्यावरील उघड्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन (FDA) याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
विशेषतः गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढते. या काळात स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवले जाण्याची शक्यता असते. नुकत्याच झालेल्या काही धक्कादायक घटनांनी ही बाब अधोरेखित झाली आहे. एका प्रसिद्ध कॅफेमधील बन मस्कामध्ये काचेचा तुकडा, तर एका हॉटेलमधील सूपमध्ये चक्क झुरळ आढळले होते. अशा गंभीर घटनांची तक्रार झाल्यानंतरच प्रशासनाकडून कारवाई होताना दिसते.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, दूषित पाणी, अर्धवट शिजवलेले मांसाहारी पदार्थ आणि उघड्यावरचे खाद्यपदार्थ हे विषबाधेचे मुख्य कारण आहे. पावसाळ्यात दूषित अन्नामुळे साल्मोनेला, ई. कोलाईसारख्या जिवाणूंचा प्रादुर्भाव वाढतो.
एफडीएने तपासणीसाठी कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण देऊन कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुणे महापालिका आणि एफडीएने संयुक्त मोहीम राबवून हॉटेल्सच्या परवान्यांची तपासणी करणे, खाद्यपदार्थांचे नमुने तपासणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा, हा ‘जीवाशी खेळ’ असाच सुरू राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































