आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरून आता राजकीय वादंग सुरू झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या प्रभाग रचनेवर गंभीर आक्षेप घेतले असून, यात भाजपने हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रभाग रचनेविरोधात हरकती नोंदवल्या जात असून, आता न्यायालयातही दाद मागितली जाणार असल्याचे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही प्रभाग रचना नैसर्गिक सीमांकडे (नदी, नाले, रस्ते) पूर्णपणे दुर्लक्ष करून तयार केली असल्याचे म्हटले आहे. यामुळे नागरिकांसाठी हे प्रभाग गैरसोयीचे ठरतील. काही प्रभागांमध्ये तर मागासवर्गीय वस्त्यांची जाणीवपूर्वक विभागणी करण्यात आली आहे, जो सामाजिक न्यायाला मोठा धक्का आहे
अरविंद शिंदे यांनी या प्रभाग रचनेवर ‘प्राणीसंग्रहालयातील वेगवेगळ्या प्राण्यांच्या छायाचित्रांसारखी’ अशी उपरोधिक टीका केली. काही प्रभाग चार वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून भाग घेऊन तयार केले गेले आहेत. यामुळे प्रशासकीय कामांमध्ये सुसूत्रता राखणे कठीण होईल, असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला आमदार बापू पठारे, माजी महापौर अंकुश काकडे, गोपाळ तिवारी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यांनी एका प्रभागात ७० हजार तर दुसऱ्या प्रभागात दीड लाख मतदार असल्याची असमानता दर्शवली. तसेच, मागासवर्गीयांवर अन्याय झाल्याचा आरोप करत, विशिष्ट समाजाचे प्रतिनिधी निवडून येऊ नयेत या उद्देशाने ही रचना केल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. या प्रकरणावरून आगामी काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे














































